Census Duty File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : जनगणनेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्क

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : देशभरात एप्रिल २०२६ पासून जनगणना प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली असून राजापूर शहरातदेखील नागरिकांची घरगुती माहिती संकलन प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जनगणनेच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

शहरात २२ प्रगणक व ४ पर्यवेक्षक कार्यरत असून सरकारी शाळा व हायस्कूलमधील शिक्षकांचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. राजापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिनित गुंगोरे हे चार्ज ऑफिसर म्हणून कार्यरत असून अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलन करत आहेत.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अधिकृत प्रगणक नागरिकांकडे कोणत्याही प्रकारची बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, पिन, सीव्हीव्ही किंवा ओटीपीची मागणी करणार नाहीत. प्रगणकांकडे भारत सरकारच्या Registrar General & Census Commissioner India यांचे अधिकृत ओळखपत्र असणार आहे. तसेच डिजिटल जनगणनेमुळे ओळखपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करून संबंधित व्यक्तीची खातरजमा करता येणार आहे.

जनगणना प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय तसेच घरातील पाणी, वीज, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत एकूण ३३ प्रश्न विचारले जाणार आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने तहसील कार्यालय किंवा नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी se.census.gov.in संकेतस्थळावर स्वतः माहिती भरल्यास त्यांना ११ अंकी SE ID प्राप्त होणार असून त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT