चिपळूण : शहरातील गांधारेश्वर येथील पुलावरून वाशिष्ठी नदीत नवदाम्पत्याने उडी घेतल्याचे बुधवारी समोर आले. त्यातील पत्नी अश्विनी नीलेश अहिरे यांचा मृतदेह धामणदेवी (ता. खेड) येथे वाशिष्ठी खाडीकिनारी सापडला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून, शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, धुळे येथून त्यांचे नातेवाईक चिपळूणमध्ये दाखल झाले असून, पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.
पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याच्या रागातून अश्विनी अहिरे यांनी आपण घरातून निघून जाते, असे सांगितले आणि फोन स्वीच ऑफ करून त्या गांधारेश्वरकडे गेल्या व रागाच्या भरात वाशिष्ठी नदीपात्रात उडी घेतली. या नंतर अश्विनी यांच्या आईचा पती निलेश अहिरे यांना फोन आला व पत्नी घरातून रागाने निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर पती नीलेश याने शोधाशोध सुरू केली असता त्याला गांधारेश्वर येथे एका तरूणीने नदीपात्रात उडी घेतल्याचे सांगितले आणि तो गांधारेश्वर येथे गेला. तोपर्यंत अश्विनी यांनी नदीत उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यानंतर पतीनेदेखील वाशिष्ठी नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याने एका नातेवाईकाला, आता जगून काय करू? असे सांगून फोन स्वीच ऑफ केल्याचे सांगितले जात आहे. त्याची मोटारसायकल देखील गांधारेश्वर पुलानजीक सापडल्याने त्यानेदेखील आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर पत्नी अश्विनी हिचा मृतदेह धामणदेवी येथे वाशिष्ठी किनारी सापडला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून मृतदेह ताब्यात घेतला व कामथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला; मात्र अद्याप पती निलेश रामदास अहिरे याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्याने वाशिष्ठी नदीत उडी घेतली की नाही या बाबत शंका उपस्थित केली जात आहे. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे अधिक तपास करीत आहेत.