खेड : तालुक्यातील नारंगी फाटा येथे गुरे वाहतुकीच्या संशयावरून बुधवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मारहाणीची घटना घडली. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झल्या असून खेड पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रसाद बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जनावरांच्या अवैध वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर ते सहकाऱ्यांसह गेले. बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नारंगी फाटा येथे सूरज जाधव व ऋतिक जाधव यांना जनावरांच्या वाहतुकीबाबत विचारणा केल्यानंतर वाद निर्माण झाला. ऋतिक जाधव याने लोखंडी पाईपने प्रसाद बर्गे यांच्या कंबरेवर वार केले तसेच दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पुलावरून ढकलून दिल्याने बर्गे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच प्रवीण कदम यांनाही मारहाण केली आहे.
ऋतिक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या भावाला गाडीत गुरे भरल्याच्या संशयावरून काही जणांनी मारहाण केली. या प्रकरणात त्रुपेश निंबाळकर, रिक्षावाले चव्हाण आणि खेडेकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या मारहाणीत सूरज जाधव जखमी झाले. तर ऋतिक जाधव यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तसेच तेजस शेलार, प्रणय शेलार, जीवन कडू व विकी जाधव यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली.