रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी नारळी पौर्णिमा तर शनिवारी रक्षाबंधन हे सण साजरे होणार असून, त्यामुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. किनारपट्टीभागात परंपरागत पद्धतीने नारळी सजत आहेत तर बाजारात रंगीबेरंबी, आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. खरेदीसाठी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी दिसून येत आहे.
नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्र देवतेची पूजा करतत समुद्राला नारळ अर्पण करतात. सध्या श्रावण महिना सुरू असून मोठ्या उत्साहात भक्त श्रावण महिन्यात व्रत, उपवास सुरु आहेत. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा हा रत्नागिरी जिल्ह्यातील कोळी बांधवांसाठी एक उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी सम्रुदाची पारंपरिक पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. रत्नागिरीला मांडवी,भाट्ये, गणपतीपुळे यासह विविध ठिकाणी विस्तीर्ण सम्रुदकिनारा लाभला असल्याने नारळी पौर्णिमेचा उत्साह येथे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतो. जिल्ह्याच्या विविध गावांमध्ये कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून एकत्र येत समुद्राची पूजा करतात. पावसाळ्यामुळे सम्रुदातील मासेमारी पूर्णत बंद असते. बंदीचा कालावधी संपुष्टात आल्याने किनार्यावर साकारलेल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केल्यावर मासेमारीला पुन्हा सुरुवात करण्याची पारंपरिक श्रध्दा आहे. त्यामुळे कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी प्रार्थना करतात.
नारळी पौर्णिमा निमित्त किनारपट्टीवरील गावांमध्ये पारंपारिक गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महिला पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करून समुद्राची ओटी करतात. त्यानंतर एकत्र येवून पारंपरिक गाण्यांवर कोळी नृत्य सादर करतात. नारळी पौर्णिमा हा सण केवळ सण नसून निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
नारळी पौर्णिमेनिमित्ताने रत्न्ाागिरी शहरातील बाजारपेठेत तरुणींनी लुगडे निवडणे, लुगड्याला साजेशा बांगड्या, नथ, कंबरपट्टा, हार, पैजण आदी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
राक्षा बंधनानिमित्त शहरातील बाजारपेठेत व तालुक्यात प्रमुख ठिकाणी विविध प्रकारच्या राख्या विक्रीस असून राख्या खरेदीसाठी महिला, तरुणी मोठी गर्दी करीत आहेत. 10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत कार्टूनच्या राख्या, साध्या, चांदीच्या, नावाच्या राख्यांनी बाजारपेठ फुलली आहे.
नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 मि.सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजता संपेल.