नाणीज : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील जुन्या मठाजवळ सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या. भरधाव रिक्षाने अचानक ब्रेक लावलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या अपघातात प्रकाश शांताराम कांबळे (४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जानवी दीपक कांबळे (२२) आणि प्रियंका दीपक कांबळे (५०) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची रिक्षा दाभोळ परिसरातून रत्नागिरीच्या दिशेने जात होती. नाणीज येथील जुन्या मठाजवळ समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरचा टायर अचानक फुटल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावला. त्यामागून येणाऱ्या रिक्षाचालकाला वाहनावर नियंत्रण मिळवता न आल्याने रिक्षा थेट ट्रॅक्टरवर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चकाचूर झाला आणि चालक प्रकाश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त ट्रॅक्टर हा रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी वापरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी महिला प्रवाशांना जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेद्वारे प्रथम पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पाली दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन कांबळे यांनी पंचनामा केला.