चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच महायुतीतील घटक़ पक्षाचे पदाधिकारी आमदार शेखर निकम व शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्या पुढाकाराने एकत्र आले व निवडणूकपूर्व बैठक घेण्यात आली. शहरातील पाग येथील सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीत चिपळूण न.प.ची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला; मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणाचा असावा याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सोपविण्यात येईल. वरिष्ठ पदाधिकारी जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करायचा आणि महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
शहरातील पाग येथील शाळेच्या सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी आ. शेखर निकम, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे सरचिटणीस जयंद्रथ खताते, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस शौकत मुकादम, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, भाजप तालुकाध्यक्ष विनोद भुरण, भाजपचे शहर मंडळ अधिकारी शशिकांत मोदी, विजय चितळे, मिलिंद कापडी, उमेश सकपाळ, विनोद झगडे, माजी सभापती पूजा निकम, स्नेहा मेस्त्री, दिशा दाभोळकर, अश्विनी वरवडेकर, राकेश जाधव व महायुतीमधील अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. सर्वप्रथम माजी आ. सदानंद चव्हाण यांनी, शिवसेना शिंदे पक्ष महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास तयार आहे अशी भूमिका मांडली; मात्र नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार इच्छुक असेल तो उमेदवार निवडण्याचा अधिकार वरिष्ठांना असेल. ते जो उमेदवार देतील त्याचे महायुती म्हणून काम करूया, असे सांगितले.
यानंतर भाजपचे शशिकांत मोदी, विजय चितळे यांनीदेखील अशाच पद्धतीने आपली भूमिका मांडली. अद्याप भाजपतर्फे कोणत्याच सूचना नव्हत्या. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागल्याचे सांगितले. मात्र महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे असे स्पष्ट केले. शेवटी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी भूमिका मांडली. न.प. निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची आहे. महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी जो उमेदवार देतील त्याचे सर्वांनी मिळून काम करू आणि न.प.वर महायुतीची सत्ता आणू. त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया असे सांगितले. महायुतीच्या पहिल्याच बैठकीत आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्यावर शिक्कामोर्तब झाले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा चेंडू वरच्या कोर्टात पाठविण्याचे ठरले. महायुतीत समन्वयासाठी कोअर कमिटीची नेमणूक केली जाईल.