रत्नागिरी खून प्रकरण  File Photo
रत्नागिरी

रत्नागिरी : मृतदेहाचे गूढ उकलताना पोलिसही चक्रावले; माहिती देणारा बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

खेड : तालुक्यातील भोस्ते घाटातील मृतदेह प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. सावंतवाडीतील तरुणाला पडलेल्या स्वप्नानंतर पोलिसांना खरोखरच मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती; मात्र आता या प्रकरणाचा उलगडा ज्या तरुणामुळे झाला तो योगेश आर्या हा तरुणच बेपत्ता असल्याचे समोर येत आहे. या तरुणाने फरार होण्यापूर्वी पोलिसांना एक चिठ्ठीही दिली असल्याची माहिती पुढे येत असून आता पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी हे प्रकरण आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिले आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये तरुणाने सांगितलेला घटनाक्रम आणि वस्तुस्थितीमध्ये प्रचंड तफावत असल्याचे समोर आले होते. एकीकडे मृत व्यक्तीचा मृत्यू ही आत्महत्या की, घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यात त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. तर दुसरीकडे या घटनाक्रमात महत्त्वाचा दुवा असलेला योगेश आर्या हा तरुण गायब झाल्याची चर्चा असून आगामी काळात पोलिसांची डोकेदुखी वाढेल, अशी शक्यता आहे.

भोस्ते घाट प्रकरणाला वाचा फोडणारा योगेश आर्या हा तरुण शुक्रवार दि. 27 पासून बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भोस्ते घाटातून एक व्यक्ती स्वप्नात येत असल्याचा योगेश आर्याचा दावा होता. पोलिसांनी त्याच्या दाव्यानुसार शोध घेतल्यानंतर घटनास्थळी सांगाडा आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणात योगेश आर्याची देखील चौकशी केली होती. मात्र, अचानक योगेश आर्या बेपत्ता झाल्याचे समजते. दुसरीकडे योगेश आर्याच्या शोधासाठी त्याचे वडीलही पोलिस अधीक्षक कार्यालयात फेर्‍या मारत आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी योगेश आर्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. पण या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे, याबाबत पोलिसांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

सावंतवाडीतील आजगाव येथे राहणार्‍या योगेश पिंपळ आर्याने, खेड भोस्ते घाटातील डोंगरात जंगलात पुरुषाचे प्रेत असून तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा, असे सांगत पोलिसांकडे धाव घेतली. दि. 17 सप्टेंबरला याबाबत आर्याने खेड पोलिस ठाण्यात तशी खबर दिल्यानंतर पोलिसांनी याची नोंद एफआयआरमध्येही केली. स्वप्नात आलेल्या त्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आपण खेडमध्ये आलो होतो, असे आर्याने पोलिसांना सांगितले. त्या दरम्यान त्याने इन्स्टाग्रामवरही काही व्हिडिओ शेअर केले. त्यामध्ये त्याने काही माहिती दिल्याचे समजते. पोलिसांनी त्याच्या प्रवासाबाबत आणि स्वप्नाबाबत विचारणा केली असता, आपण खेडमध्ये त्या मृतदेहाच्या शोधासाठी आलो होतो. परंतु मी आल्यानंतर दुसर्‍या दिवशी शुद्धीत आलो, तर मी सुरतमध्ये होतो. तेथे काही फोटो काढले. त्यानंतर पुन्हा प्रवासात मला जेव्हा जाग आली, तेव्हा खेड रेल्वे स्थानकाचा बोर्ड दिसला, असा दावा आर्याने केला होता. त्यानंतर खेडमध्ये उतरल्यावर मी चार दिवस मृतदेहाच्या शोधत असल्याचे योगेशने पोलिसांना सांगितले. त्याच्या जबाबत वारंवार होणार बदल आणि वस्तूस्थिती यामध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. या घटनेचा तपास खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्याकडून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी धडपड सुरू असून खेड, गोवा, सिंधुदुर्गमधील बेपत्ता झालेल्यांची पोलिस माहिती घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT