खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे स्टॉप येथे 4 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास उभी असलेल्या वॅगनार मोटार (एमएच 02 जे पी 8951) या वाहनाला अचानक आग लागल्याची माहिती खेड नगर परिषद अग्निशमन विभागास दूरध्वनीद्वारे प्राप्त झाली.
माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि सुरज शिगवण यांनी तत्परतेने आग विझवण्याचे काम हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जलद आणि समन्वयित कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली होती. खेड नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या तत्पर सेवेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.