रत्नागिरी : प्रवाशांच्या नियमित भाडेवाढीनंतर लग्नसभारंभ, पर्यटन, धार्मिक यात्रा व खासगी कार्यक्रमांसाठी आरक्षित केल्या जाणाऱ्या विशेष बससेवेच्या दरातही वाढ झाली आहे. किमान आकारणी, रद्द शुल्क, अतिरिक्त वेळेची आकारणी, ई-बससाठी स्वतंत्र नियम आणि अनामत रकमेत बदल केले आहेत. शैक्षणिक सहलींना मिळणारी ५० टक्के सवलत कायम आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध सवलती दिल्या जात असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लालपरीला ग्रामीण भागातील जीवनवाहिनी देखील मानले जाते. त्यामुळे अनेकांकडून विविध कार्यक्रमांसाठी सुरक्षित व किफायतशीर प्रवासासाठी खासगी वाहनापेक्षा लग्नासाठी एसटीची निवड केली जाते; मात्र महामंडळाने नियमित तिकीट दराबरोबरच खासगी कार्यक्रमासाठी एसटीचे बुकिंग महाग केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट आता कोलडणार आहे. खासगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडेवाढीला कंटाळल्यामुळे सुरक्षित व विश्वासार्ह म्हणून एसटीची निवड करताना खिशावर अतिरिक्त ताण येणार आहे. एसटी महामंडळाच्या या नवीन निर्णयामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. लग्न सोहळ्यासाठी ही बस बुक करता येते. यासाठी आधी सवलत दिली जात होती. त्याचबरोबर खासगी कार्यक्रमासाठीही बुकिंग करता येते. मात्र आता दरवाढ झाल्याने खासगी कार्यक्रमासाठी बस घेताना बजेट कोसळणार आहे.