रत्नागिरी : शिमगोत्सवात रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले होते. लाखो चाकरमान्यांनी यंदाही लाडक्या लालपरीलाच पसंती दिली असून चाकरमान्यांना आणण्यासाठी व त्यांच्या परतीसाठी लालपरी सुसाट धावली. तब्बल 1 हजार एसटी बसेसचे बुकिंग झाले होते. ग्रुप बुकिंग, वैयक्तिक बुकिंगमुळे रत्नागिरी विभाग मालामाल झाला असून अंदाजे 35 ते 38 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सवनंतर शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण मानला जातो कोकणी माणूस हमखास शिमगोत्सवाला सुट्टी घेऊन आपल्या घरी येतोच. आपल्या मुळ गावी येण्यासाठी यंदाही कोकणकरांनी हक्काच्या, लाडक्या लालपरीलाच पसंती दिली. मुंबई, पुणे येथून कोकणात येण्यासाठी व रत्नागिरी विभागात गावोगावी तसेच परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांनी रेकॉर्डब्रेक बुकिंग केले असून तब्बल 1 हजारहून अधिक एसटी बसेसचे बुकिंग झाले होते. त्यातून अंदाजे 35 ते 38 कोटींहून अधिक उत्पन्न रत्नागिरी विभागास मिळाले असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी 450 एसटी बसेस धावल्या होत्या. मात्र यंदाच्या वर्षी दुप्पट एसटी बसेस बुक होऊन मुंबई, रत्नागिरी मार्गाने धावल्या. एकंदरीत सणासुदीत यंदाही कोकणकरांनी आपल्या लाडक्या लालपरीलाच पसंती दिल्यामुळे रत्नागिरी विभागास कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले आहे.