रत्नागिरी : एसटी विभागाच्या वतीने विविध साहित्य, भाजीपाला, बांधकामाचे साहित्य यासह विविध सेवा देण्यासाठी महाकार्गोसेवा सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात एसटी ठप्प झाल्या होत्या. त्याकाळात एसटीला महाकार्गो सेवेने तारले. कोट्यवधीचे उत्पन्न मिळवून दिले होते. मात्र कोरोनानंतर परिस्थती बदलली आहे. व्यापारी, शेतकरी आता खासगी गाड्यामधून वाहतूक करत असल्यामुळे एसटीच्या महाकार्गो सेवेला फटका बसला आहे. रत्नागिरी आगारातील महाकार्गो सेवेला कमी प्रतिसादाअभावी ही सेवा एक वर्षापासून बंद होती. आता ही सेवा पूर्ण बंद झाली आहे. मालवाहतूक गाड्यांची आयुर्मान पूर्ण झाल्याने आगारातील 8 मालवाहतूक गाड्या भंगारात काढल्या आहेत.
एसटी महामंडळ कित्येक वर्षापासून अडचणीत आहे. महामंडळ तोट्यात आहे. कोरोनाकाळात प्रवासी वाहतूक बंद असताना एसटी महामंडळाला मोठा फटका बसला होता. तो तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने राज्यात महाकार्गो सेवा सुरू केली. त्यासाठी बसेसचे आसने, छत काढून त्याचे रूपांतर मालवाहतूक ट्रॅकमध्ये करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातभरात महाकार्गोसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे पहिली वाहतूक रत्नागिरीहून बोरिवलीत आंब्याच्या पेट्या घेवून आली होती. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळाला. याचा फायदा रत्नागिरी आगाराला मिळाला. कोरोनानंतर चित्र बदलले. रत्नागिरी आगारात महाकार्गो सेवेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महाकार्गो सेवेच्या 8 एसटी बसेस कित्येक महिने जागेवरच थांबून ठेवण्यात आलल्या होत्या. अखेर या गाड्या स्क्रॅपसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
शेतकरी, व्यापारी तसेच लघू आणि मोठे उद्योजक हे मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाला, धान्य, औद्योगिकमध्ये यंत्र साम्रगी, बांधकाम साहित्य, कापड उद्योगामध्ये कच्चा माल तयार उत्पादने, फर्निचर, इतर घरगुती वस्तू, खाद्य पदार्थ, खत, बियाणे यासह विविध वस्तूंची मालवाहतूक होत होती.