electricity bill pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्‍नागिरीत थकित वीजबिल वसुलीमुळे देखभाल रखडली!

दर सोमवारी ५ ते ६ तास वीज खंडित; नागरिकांत नाराजी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : महावितरणचे तांत्रिक कर्मचारी थकित वीजबिल वसुलीच्या कामात गुंतल्याने दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे रखडत असून त्याचा फटका रत्नागिरी शहरातील वीज ग्राहकांना बसत आहे. आठवडाभर प्रलंबित राहिलेली देखभाल व दुरुस्तीची कामे दर सोमवारी एकत्रितपणे केली जात असल्याने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सलग पाच ते सहा तास बंद ठेवावा लागत आहे.

महावितरणवर वीज निर्मिती कंपन्यांना नियमित देयके अदा करण्याचा ताण असल्याने थकित वीजबिलांची वसुली वेगाने करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून दिले जात आहेत. परिणामी अभियंत्यांपासून तांत्रिक कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व यंत्रणा वसुली मोहिमेत गुंतली आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांना दिवसभर ग्राहकांकडे जाऊन थकित वीजबिल वसूल करणे किंवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जबाबदारी दिली जात असल्याने नियमित देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी वेळ मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आठवडाभर प्रलंबित राहिलेली कामे दर सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत हाती घेतली जातात.

या कालावधीत शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिक, व्यापारी, उद्योग तसेच कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. दर सोमवारी एबी स्विचची देखभाल, जंपर बाइंडिंग, ऑइलिंग, ग्रीसिंग, ट्रान्सफॉर्मरची देखभाल, तुटलेले स्टे जोडणे, सैल झालेल्या ओव्हरहेड वीजवाहिन्या ताणणे, जळालेले फ्यूज बदलणे, डीपी बॉक्सची दुरुस्ती आदी कामे केली जात आहेत. मात्र ही कामे नियमितपणे होत नसल्याने एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याची स्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT