रत्नागिरी : शनिवारी पडलेल्या वळवाच्या पावसाने कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर नाणिज परिसरात ठेकेदाराने ठेवलेल्या अर्धवट कामाचा फटका महामार्गाच्या दोन्ही बाजूकडे राहणार्या ग्रामस्थांना बसला. महामार्गावरील आऊटलेटची कामे न झाल्यामुळे लोकांच्या घरात, अंगणात, दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान झाल्याचे प्रकार घडले. अवकाळी पावसात असा फटका बसत असेल तर मान्सूनमध्ये काय अवस्था होईल असा प्रश्न नाणिज ग्रामस्थांनी उपस्थित करीत तीव्र नाराजी केली आहे.
मागील दोन दिवसांपासून नाणिज पंचक्रोशीमध्ये वळवाचा पाऊस पडत आहे. शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस कोसळला. यामुळे महामार्गावरुन आलेले पाणी थेट सर्व्हीस रोडवर पडत होते. तेथून थेट पाणी रस्त्याच्या बाजूला राहणार्या नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये, अंगणात घुसले. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूने गटारांची कामे अर्धवट ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पावसात येणारे पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसत आहे. गतवर्षीही अशीच परिस्थिती झाली होती. मात्र वर्षभरात त्यावर कोणतेच काम ठेकेदार कंपनीने केले नसल्याचा आरोप भाजपा युवाचे पदाधिकारी चिराग खटकूळ यांनी केला आहे.
नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात पाणी ग्रामस्थांच्या घरात, दुकानांमध्ये व अंगणात घुसल्यामुळे ग्रामस्थांना मोठी धावपळ करावी लागली. अवकाळी पावसात ही अवस्था असेल तर मान्सूनमध्ये ग्रामस्थांनी करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मान्सूनला आणखी पंधरा-वीस दिवस असून, ठेकेदार कंपनीने तातडीने यावर मार्ग काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.