रत्नागिरी

Ratnagiri News : मिरकरवाडा समुद्रात एलईडी मासेमारी नौका पकडली!

मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाची धाडसी कारवाई; तीन दिवसांतील चौथी घटना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ःमिरकरवाडा बंदरासमोर समुद्रात एलईडी प्रकाशात मासेमारी करणारी नौका साहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पाठलाग करून पकडली. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई झाली आहे. हलिमा मरियम असे एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेचे नाव असून ती मिरकरवाडा बंदरात उभी करुन ठेवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांतील ही चौथी कारवाई आहे.

साहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी, पार्थ तावडे यांच्या नेतृत्वाखाली सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर, सृजन पवार, सुरक्षारक्षक सतिश राठोड, अमोल पिलणकर हे पथक शारदा गस्ती नौकेने रात्री समुद्रात गस्त घालत होते. त्यावेळी मिरकरवाडा बंदरासमोर एलईडी प्रकाशझोतात मासेमारी होत असल्याचे दिसून आले. गस्ती नौका त्या दिशेने पुढे जात होती. एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका तांडेलला गस्ती नौका येत असल्याचे कळताच त्याने ती नौका पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु शारदा गस्ती नौकेने पाठलाग करून या नौकेला पकडून कारवाई केली.

सध्या समुद्र खवळलेला असून उंच लाटा आणि जोरदार वाऱ्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून समुद्रातील गस्त धोक्याची झाली आहे, परंतु मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी एलईडी प्रकाशातील मासेमारीविरुद्ध जोरदार कारवाया करण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर साहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने रात्रीचा दिवस करत एलईडी नौकावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसांत ऑपरेशन क्लिन सी मोहिमेंतर्गत मध्यरात्रीच्या वेळेस तीन आणि बुधवारी रात्री मिरकरवाडा समुद्रात अशा चार कारवाया केल्या आहेत.

साहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने गेल्या चार दिवसांपासून एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याचे सातत्य कायम ठेवले आहे. या कारवाईत 5 लाख दंडाची तरतुद असल्याने एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका मालकांना धडकी भरली आहे. ही बेकायदेशीर एलईडी मासेमारी संपुष्टात आणण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT