रत्नागिरी ःरत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यउद्योग वसाहतीतील ओपन स्पेसमध्ये अंडरआर्म स्टेडियम बनवण्याची संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करावी. त्याचबरोबर हे काम सुरु केले जाऊ नये यासाठी स्थगिती मिळण्याच्या मागणीसाठी एका मक्तेदाराने न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्याचबरोबर 1 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली आहे. हे स्टेडियम सुमारे दिड कोटी रुपये खर्चाचे आहे. न्यायालयात गेलेल्या ठेकेदाराच्या निविदेच्या दस्ताऐवजमधील प्रतिज्ञापत्रावर सही नसल्याने मुख्याधिकारांनी त्यांची निविदा अवैध ठरवली आहे.
मिरकरवाडा येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती, नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून अंडरआर्म स्टेडियम विकसीत करण्याबाबतची निविदा प्रक्रिया झाली. ऑगस्ट महिन्यात आलेल्या निविदांचे लखोटे उघडले गेले. त्यामध्ये महेश गडेवार यांच्या निविदेतील दस्ताऐवजांमध्ये असलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही नव्हती. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी ती निविदा अवैध ठरवल्याने दुसऱ्या मक्तेदाराला या स्टेडियमचे काम मिळाले. ही निविदा अवैध ठरवण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगत या मक्तेदाराने मुख्त्यार प्रथमेश सावंत यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागीतली आहे. या प्रकरणी 15 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
रत्नागिरी जिल्हयामध्ये अंडरआर्म क्रिकेटचे मोठे आकर्षण आहे. हे सामने कुठेही असले तरी ते पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे अशा सामन्यांसाठी एखादे अद्ययावत स्टेडियम असण्याची गरज होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी हे स्टेडियम व्हावे यासाठी पुढाकार घेतला. मिरकरवाड्यातील मत्स्योद्योग वसाहतीमध्ये असलेल्या मोकळया जागेमध्ये स्टेडिअम करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही पूर्ण करुन घेण्यात आली. यामध्ये अंदाजपत्रक बनवणे, ठराव, प्रस्तावाला प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळवल्यानंतर निविदा प्रक्रिया पार पडली. कार्यारंभ आदेशापासून 300 दिवसात हे स्टेडियम पूर्ण करुन द्यायचे आहे.
स्टेडियमच्या या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच ज्या ठेकेदाराची निविदा नाकारली गेली त्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. पूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द करावी, स्टेडियम विकसीत करण्याच्या कामाला स्थगिती द्यावी. त्याचबरोबर नुकसान भरपाई म्हणून 1 लाख रुपये नगर परिषदेने द्यावेत अशी मागणी न्यायालयात केलेल्या दाव्यातूत करण्यात आली आहे.