राजापूर : राजापूर शहरातील कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील एका लॉजवर अल्पवयीन युवतीला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आणखी चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, संबंधित लॉजच्या मालकाविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मीडिया आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर झालेल्या ओळखीचा तसेच मैत्रीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन युवतीला कोदवली साईनगर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडीओ अन्यत्र प्रसारित करण्यात आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी यापूर्वी एका अल्पवयीन युवकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
व्हिडीओ केला व्हायरल
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे व्हिडीओ कोणी आणि कोणामार्फत प्रसारित केला, याचा शोध घेतला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६३(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉज मालकाविरोधातही गुन्हा
दरम्यान, अल्पवयीन युवतीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणात कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील लॉज मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असून, संशयित आरोपींना नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा तपास राजापूर पोलिस करीत असून, सर्व संबंधित आरोपींविरोधातील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. हे प्रकरण लवकरच राजापूर न्यायालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.