रत्नागिरी : गेली तीन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येत्या दिवाळीमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुक तयारीचा नुकताच आढावा घेतला. भर दिवाळीच्या उत्सवात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीचे 112 गण असून राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका प्रलंबित आहेत. साधनांच्या कमतरेमुळे आयोगाला एकाचवेळी सर्वाच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे संकेत राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले आहेत. गेली तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आधी कोरोना महामारी आणि नंतर प्रभाग रचना, मराठी आंदोलन तसेच ओबीसी आरक्षण आदी मुद्यांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधी घेतल्या जातील. त्यानंतर महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबत विचार राज्य निजवडणूक आयोगाकडून सुरू असल्याचे समजते.
येत्या दिवाळीच्या उत्सवात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 56 गट असून 112 गण आहेत. प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु आहे. येत्या 18 ऑगस्ट नंतर प्रभाग रचनेला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. त्यामुळे 2017 च्या तुलनेत यावेळी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आता जि.प. निवडणुका तीन चार महिन्यावर आल्याने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. तर राजकीय पक्षांनी कार्यकर्ते मेळाव्यांवर भर दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 2011 च्या जन- गणनेवर आधारीत ही निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे, पण गेल्या दहा वर्षात वाढलेले मतदार पहाता अनेक जण यावेळी मतदानास मुकण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.