रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरजोळे, उद्यमनगर एमआयडीसीसह काही ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाऱ्या पाच धरणांमध्ये सध्या २५.३७ लाख क्युबिक मीटर एवढा पाणीसाठा असून, यातील घाटीवळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हा पाणीसाठी मे ते जून महिन्यापर्यत पुरेल या दृष्टीने एमआयडीसीकडून नियोजन केले जात आहे. त्यामुळे पाणी संकटातही उद्योगांना दिलासा मिळणार आहे.
लांजा व रत्नागिरी तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीवर घाटीवळे, अंजणारी, असोडे, निवसर व हरचेरी या पाच ठिकाणी छोटी धरणे उभारण्यात आलेली आहेत. या धरणांची पूर्ण क्षमता २५.३७ लाख क्युबिक मीटर पाणी साठवण्याची आहे. एमआयडीसीच्यावतीने उभारण्यात आलेल्या या धरणांपैकी हरचेरी येथे जुन्या धरणाच्या खालील बाजूलाच नवीन बंधारा बांधण्यात आलेला आहे. असोडे येथील नव्याने काम करण्यात आले आहे. नवीन धरणांमुळे पाणी साठ्यात वाढ झाली झाली.
पाऊस संपल्यानंतर या धरणामध्ये प्लेट व माती टाकून याची पाणी साठवणूक क्षमता वाढवण्यात येते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहून जाणाऱ्या पाण्याचा साठा वाढतो. दरवर्षी वाढीव साठा करण्यासाठी जवळपास १७ ते १८ लाखाचा खर्च एमआयडीसीला येतो. याठिकाणी पाच ते सहा महिने देखरेखीकसाठी वॉचमनही ठेवला जातो.
सध्या या पाचधरणांमध्ये २५.३७ लाख क्युबिक मीटर एवढा पाणीसाठा असून मृतसाठा वगळून वापरात येणारा २२.७७२ लाख क्युबिक मीटर पाणीसाठा आहे. यामध्ये हरचेरी धरणामध्ये ६.६६ लाख क्युबिक मीटर, निवसरमध्ये २.७१ लाख क्युबिक मीटर, असोडेमध्ये २.७ लाख क्युबिक मीटर, अंजणारीमध्ये ७.४४ लाख क्युबिक मीटर तर घाटीवळेत ३.२६२ लाख क्युबिक मीटर एवढा पाणीसाठा आहे. असोडे व अंजणारीमध्ये पाणीसाठ्यात दरवर्षीपेक्षा घट दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी तीनचार दिवस अचानक पडलेल्या पावसामुळे घाटीवळे धरण पूर्ण क्षमतेने भरुन गेले आहे. धरणातील पाणीसाठा मे अखेरीपर्यत पुरवण्याच्या दृष्टीने एमआयडीसी नियोजन करत आहे.