सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊनही कंपनी मालक मोकाट Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri crime : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊनही कंपनी मालक मोकाट

दोन अधिकारी अटकेत; गरम मातीमुळे भाजून महिलेचा मृत्यू प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

खेड : लोटे परशुराम औद्योगिक परिसरात रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेल्या गरम मातीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असला तरी कंपनी मालकाला गजाआड करण्यात पोलिसांना अद्याप अपयश आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी व्यवस्थापनातील दोन अधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.

ही घटना 22 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास लोटे परशुराम एमआयडीसी परिसरातील पुष्कर कंपनीच्या आवारात घडली. याबाबत ललिता चंद्रकांत सोनवणे (40, रा. बहादूरशेख नाका, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. मृत शंकुतला बबन सोनवणे (48) या त्यांच्या सख्ख्या चुलत सासू होत.

फिर्यादी व मृत महिला या दोघी कचरा गोळा करण्यासाठी कंपनीच्या आवारात गेल्या असता, कंपनीतून बाहेर उघड्यावर टाकण्यात आलेल्या केमिकलयुक्त गरम मातीमध्ये शंकुतला सोनवणे पडल्या. या घटनेत त्यांच्या अंगावरील कपडे जळून त्या गंभीर भाजल्या गेल्या. त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान 22 मार्च रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी कंपनीचे मालक गौतम मखारिया, सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एचआर मॅनेजर सचिन मनवळ, कमर्शियल मॅनेजर रविंद्रकुमार भुतिया तसेच इतर संबंधित व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी कंपनी मालकाला वगळून व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, 3 एप्रिल 2026 रोजी सचिन मनवळ (43, रा. भरणे बाईतवाडी) व रविंद्रकुमार भुतिया (53, रा. चिपळूण) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, केमिकलयुक्त गरम मातीमुळे अपघात होण्याची शक्यता माहिती असूनही संबंधितांनी ती सुरक्षितपणे विल्हेवाट न लावता उघड्यावर टाकली, हा गंभीर निष्काळजीपणा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोटे परशुराम औद्योगिक परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT