Marleshwar News 
रत्नागिरी

Marleshwar News| मार्लेश्वरच्या डोंगराला सुरुंगाचे हादरे; ऋत्वीच्या मृत्यूनंतरही धोका कायम!

पुलाच्या कामासाठी ५० ते ६० सुरुंगस्फोट केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वरच्या डोंगराला विकासकामांच्या नावाखाली सुरुंगाचे हादरे का बसले, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. श्री दत्त मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्या कामासाठी नदीपात्रात करण्यात आलेल्या ५० ते ६० सुरुंगस्फोटांमुळे डोंगरावरील खडक सैल झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याच डोंगरावरून कोसळलेल्या दगडाने १४ नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील चार वर्षीय ऋत्वी पाटील हिचा बळी घेतला. त्यानंतर गुहेतही दगड कोसळल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जानेवारी २०२७ मधील मकरसंक्रांतीच्या यात्रेपूर्वी संपूर्ण परिसर सुरक्षित करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

मंदिरापासून अवघ्या १०० ते १५० मीटर अंतरावर पुलाच्या कामासाठी सुरुंगस्फोट करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जानेवारी २०२६ मध्येच मारळ ग्रामस्थांनी तहसीलदार आणि देवरुख पोलिसांकडे निवेदन देऊन या प्रकाराला विरोध केला होता. ५ जानेवारीला डोंगरावरील खडक सैल होत असल्याची तक्रार, १५ फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी गुहेत दगड कोसळून महिला भाविक जखमी झाल्याची घटना आणि ३० एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेले निवेदन, असे इशारे यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र, वेळीच उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

१४ नोव्हेंबरच्या दुर्घटनेत ऋत्वी संदीप पाटील हिचा मृत्यू झाला, तर तिचे वडील व चुलते जखमी झाले. या घटनेनंतर आमदार किरण सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासन व ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांच्या पुढाकाराने गुहा आणि संपूर्ण डोंगराचे तज्ज्ञांमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सैल दगड हटवणे, वाहनतळापासून मंदिर व धबधब्यापर्यंत संरक्षक जाळ्या बसवणे आणि धोकादायक ठिकाणे निश्चित करण्याच्या उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, गुहेच्या गाभाऱ्यातही दगड कोसळल्याने काही काळ दर्शन थांबवावे लागले. त्यामुळे धोका केवळ धबधब्याच्या मार्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. पुलासाठी झालेल्या सुरुंगस्फोटांचा डोंगरावरील खडकांवर परिणाम झाला का, स्फोटांच्या परवानग्या व सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

मकरसंक्रांतीच्या यात्रेला हजारो भाविक येणार असल्याने केवळ संरक्षक जाळ्यांपुरती उपाययोजना न ठेवता डोंगर, गुहा आणि दर्शनमार्गाची कायमस्वरूपी सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची कसोटी ठरणार आहे.

दोषींवर कारवाई

दरम्यान, आमदार शेखर निकम यांनीही जिल्हाधिकारी मनुज जिंदाल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्याशी संपर्क साधून प्राथमिक चौकशीच्या सूचना दिल्याचे स्पष्ट केले. सखोल चौकशी, दोषींवर कारवाई आणि सुरक्षा उपायांसाठी मुख्यमंत्र्यांकडून अतिरिक्त निधी मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT