रत्नागिरी : ‘एकच मिशन, शासन सेवेत समायोजन’ या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या राज्यव्यापी आंदोलनामध्ये काळ्या फिती लावून निषेध नोंदवत मनरेगातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक आणि जबाबदारीने काम केल्यानंतरही नियमितीकरण, सेवा सुरक्षा आणि समान वेतनसारख्या मूलभूत मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत मनरेगातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनातर्फे मनरेगा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळताना रोजगार निर्मितीही होत आहे. एका बाजूला या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळत असताना या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामकाज करणारे कर्मचाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षापासून केल्या जात असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामध्ये शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी करणे या प्रमुख मागणीसह सेवा सुरक्षा आणि समान वेतन आदी मागण्यांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सातत्याने लक्ष वेधूनही शासनाकडून साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे मनरेगांतर्गंत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.या राज्यव्यापी आंदोलनामध्ये काळ्या फिती लावून निषेध नोंदवत मनरेगातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेले 1 जिल्हा एम.आय.एस. समन्वयक, 9 सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, 17 तांत्रिक सहाय्यक आणि 33 क्लार्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा 60 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिक आणि जबाबदारीने काम केल्यानंतरही मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना मागण्यांची पूर्ती व्हावी, अशी अपेक्षा मनरेगातील आंदोलक कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागण्यांना मंजुरी न मिळाल्यास भविष्यामध्ये अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मनरेगातील कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनावर शासन कोणता निर्णय घेणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.