Dapoli Alphonso Mango Farming News
प्रवीण शिंदे
दापोली : दापोली तालुक्यात हवामानाचा सूर अचानक बदलला असून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. बुधवारी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर दुपारचे तापमान तब्बल 33.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दिवसाच्या वेळी जाणवणारा उकाडा आणि रात्री गारव्याचा लवलेशही नसल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
साधारण 15 नोव्हेंबरच्या सुमारास थंडी ही समाधानकारक होती. मात्र, काही दिवसांत तापमान वाढत गेले आणि डिसेंबरच्या उंबरठ्यावरही थंड हवा जाणवू लागलेली नाही. या अनियमित हवामानाचा सर्वाधिक परिणाम आंबा झाडांच्या वाढीच्या नैसर्गिक चक्रावर होत आहे. झाडांच्या जीवनचक्रातील विश्रांतीची अवस्था थंडीमुळे पूर्ण होते, त्यानंतरच झाड मोहरासाठी तयार होते. परंतु योग्य प्रमाणात थंडी न मिळाल्यास मोहर उशिरा येणे, कळी न उठणे आणि झाडांची वाढ फळधारणेपेक्षा वाढीकडे झुकणे अशी स्थिती निर्माण होत आहे. परिणामी येत्या हंगामात उत्पादनाचा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कृषी जाणकारांच्या मते, हवामानातील हा कल कायम राहिल्यास मोहर आणि फुलधारणेत 20 ते 30 टक्क्यांपर्यंत घट होण्याची दाट शक्यता आहे. फळांची संख्या व आकार कमी होतोच, शिवाय दर्जा, चव, साखर प्रमाण आणि रंग यावरही परिणाम दिसून येतो. यामुळे बाजारात दर चढे राहिले तरी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या हाती कमी उत्पन्न येण्याची परिस्थिती निर्माण होते.
दापोली तालुक्यात सुमारे 6 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड आहे. कोकणच्या अभिमानाचा मान असलेल्या दापोली हापूसचे या वर्षी उत्पादन व दर्जा यावर तापमानवाढीचे सावट दाटले असून, बागायतदारांसह ग्राहकांमध्येही काळजीचे वातावरण आहे. हवामानातील या बदलाने हवामान बदलाची गंभीर चाहूलही अधोरेखित केली आहे. एकेकाळी समुद्रकिनार्यावरील थंड हवेसाठी ओळख असलेल्या दापोलीत गेल्या काही वर्षांत थंडीचा कालावधी घटत चालला आहे. उन्हाचा दाह वाढला असून ऋतूंच्या हालचाली विस्कळीत होत आहेत. हा पिकांसाठी धोक्याचा इशाराच आहे.
कृषी विभाग आणि तज्ज्ञांनी अनावश्यक पाणी व खतांचा वापर टाळण्याचा, बाग स्वच्छ ठेवत कीड-रोग नियंत्रणावर भर देण्याचा, तसेच हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती गंभीर राहिल्यास तज्ज्ञ मार्गदर्शनानुसार उपाययोजना करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. या तापमानात झाडं वाढीच्या अवस्थेतच राहतात. थंडी नाही तर मोहोर कसा येणार?”पांडुरंग मळेकर, कात्रण, दापोली.