रत्नागिरी : रत्नागिरीचे प्रवेशव्दार आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मांडवी समुद्रकिनाऱ्यासह संपूर्ण शहराची प्रभागनिहाय स्वच्छता राहावी यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. मांडवी समुद्रकिनाऱ्यावर पुरेशा अंतरांवर डस्टबीन ठेवले जाणार आहेत. त्याचबरोबर शहराची प्रभागनिहाय स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छ प्रभाग स्पर्धा घेण्याचे नियोजन केले जात आहे. स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन प्रभागांना पारितोषिके दिली जाणार आहेत.
मांडवी समुद्रकिनारी स्थानिकांसह जिल्हयाबाहेरील पर्यटकांचीही रोजच्या रोज गर्दी असते. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यासह आजुबाजूच्या परिसरात कचरा मोठया प्रमाणात टाकला जातो. यामुळे होणाऱ्या विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी स्थानिक नगरसेवक तथा बांधकाम समीती सभापती संतोष उर्फ बंटी किर यांनी येथील स्वच्छतेबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली. त्यानुसार समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना कचरा टाकणे सोयीचे व्हावे यासाठी थोड्या थोड्या अंतरावर पुरेशा संख्येने डस्टबीन उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ईको-फ्रेन्डली टाकाउ वस्तूंपासून बनवलेली बाकडी समुद्रकिनाऱ्यावर बसवण्यात येणार आहेत.
रत्नागिरी शहरातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ प्रभाग स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन सुरु झाले आहे. आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी शहरवासियांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतला जाणार आहे.
स्वच्छ प्रभाग स्पर्धेच्या माध्यमातून प्रभागनिहाय स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचऱ्याचे वर्गिकरण, सार्वजनिक ठिकाणी रस्ते व गटारांची स्वच्छता, वृक्षारोपणासह सुशोभिकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्वच्छ प्रभाग स्पर्धा सहाय्यभूत ठरणार आहे. बुधवारच्या सर्वसाधारण सभेत या दोन्ही विषयांना मंजुरी देऊन तातडीने अंमलात आणली जाणार आहे.