Marathi Sahitya Sammelan  Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Sahitya Sammelan : राजे पकडले गेले नसते तर भारताचा नकाशा बदलला असता!

‌‘ग्रामीण साहित्यातील कोकण‌’वरील परिसंवादात डॉ. सागर देशपांडे यांचे मत

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कोकणात दुसऱ्या छत्रपतींना पकडले गेले आणि कैदही झाली, परंतु छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी ज्योत्याजी केसरकर, आप्पा शास्त्री यांचे प्रयत्न असफल ठरले. जर छत्रपती संभाजी महाराज खरोखरंच पकडले गेले नसते तर मात्र भारताचा नकाशा बदलला असता. एका राजाच्या जाण्याने पुढचे सर्व चित्र बदलले, असे मत डॉ. सागर देशपांडे यांनी मांडले.

मांडकी-पालवण येथे झालेल्या ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलताना ते म्हणाले, मराठी माणसाचा मोठेपणा त्याच्या मृत्यूनंतरच समजतो. तो असताना त्याचा मोठेपणा लक्षात येत नाही. सर्वाधिक देशभक्त कोकणाने दिले, पण त्याच कोकणाने दाऊदही दिला. सहा भारतरत्न, दोन लोकसभा अध्यक्ष, चार मुख्यमंत्री या कोकणनेच दिले. कोकणानेच हिंदवी स्वराज्याची राजधानी दिली. अखिल भारतासाठी लढणे हीच मराठ्यांची ओळख आहे. कोकणची सुरक्षितता पर्यायाने देशाची सुरक्षितता आहे. कारण कोकणला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. याच कोकणामध्ये ज्यांनी कोकण रेल्वे आणली त्याच मधु दंडवतेना या कोकणने पाडले आणि महाराष्ट्राचा पहिला मराठी पंतप्रधान त्यामुळे झाला नाही. त्यांचा पराभव झाल्याने पहिला मराठी पंतप्रधान देशाला मिळू शकला नाही. जगभरात पंधराशे कोटीहून अधिक मराठी माणसे आहेत. मग असे असताना अन्य भाषांचा आग्रह कशाला? आज कोकण ओस पडत चालला आहे. तो वृद्धाश्रम होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे, असे मत त्यांनी मांडले.

या परिसंवादात सहभाग घेतलेले विजय हटकर म्हणाले, कोकणीपण हा कोकणचा स्वभाव आहे. कवी केशवसुत, वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, माधव काटदरे, पु. ल. देशपांडे, गो. नि. दांडेकर अशी अनेक साहित्यिकांची नावे सांगता येतील. पडघवलीमध्ये कोकणी माणसाचे जीवन दिसते. रवी दिघे, हमीद दलवाई यांनी कोकणचे जीवन आपल्या साहित्यात मांडले. त्यामुळे कोकणच्या निसर्गात ग्रामीण साहित्यिक निर्माण झाले आणि त्यात कोकण प्रकर्षाने दिसले. सुभाष लाड म्हणाले, येथील चालिरिती, परंपरा या मौखिक साहित्यातून पुढे चालत आल्या. प्रसाद गावडे म्हणाले, अलिकडे कोकणात लोक येऊ लागले आहेत. रिसॉर्ट होत आहेत, बंगलो बनत आहेत. त्यातून जमीन खरेदी-विक्रीच्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. कोकणला असा विकास नको आहे, तर कोकणचे गावपण टिकले पाहिजे, असे मत मांडले.

प्रा. लक्ष्मण पाटील म्हणाले, कोकण आज प्रसिद्ध होण्यास मागे पडले. कारण आम्ही आमच्या परंपरा, चालिरिती, संस्कृतीचे लिखाण करण्यास कमी पडलो. ज्ञानेश्वरीपासून आमची मराठी अभिजात आहे. आज कोकणावर फक्त 12 टक्के लिखाण झाले आहे. उर्वरित कोकण लिखीत स्वरूपात येणे बाकी आहे, त्यावर अभ्यास झाला पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT