Sunil Tatkare 
रत्नागिरी

Sunil Tatkare| नळपाणी योजनेचे श्रेय कोणाचे, हे मंडणगडची जनता ओळखते

खासदार सुनील तटकरे यांचे सूचक प्रतिपादन; अमृत २.० योजना, नमो उद्यान, स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : दापोली विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली, मात्र कधीही श्रेयवादाचा दावा केला नाही. मंडणगड शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीचे श्रेय कोणाचे आहे, हे येथील सुज्ञ जनता निश्चितच ओळखते, असे सूचक प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.

मंडणगड शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा अमृत २.० योजना, नमो उद्यान प्रकल्प आणि सार्वजनिक स्वच्छतागृहाचे भूमिपूजन १२ नोव्हेंबर रोजी खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त नगर पंचायतीसमोर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी खासदार सुनील तटकरे पुढे म्हणाले की, कोकणवासीयांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मुंबईसारख्या महानगरात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता कोकणातच शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने पावले उचलली आहेत. मंडणगड शहरातील वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेता सक्षम पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण होणे गरजेचे होते. त्यासाठी अमृत २.० योजनेला मंजुरी मिळाली असून केंद्र सरकारचा ५० टक्के व राज्य शासनाचा ४५ टक्के निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्याचा निर्णयही शहरीकरण आणि विकास प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले.

दापोली मतदारसंघाचे नेतृत्व विविध पक्षांना करण्याची संधी मिळाली असून प्रत्येकाने आपापल्या परीने जनतेची सेवा केली आहे. आपण १७ व्या आणि १८ व्या लोकसभेत खासदार म्हणून काम करताना विकासाला प्राधान्य दिले. बहुजन समाजाचे व्यापक हित साधायचे असेल तर सत्तेत सहभागी असणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते स्व. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रेवस ते रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी मांडली होती. दीर्घकाळ रखडलेल्या या मार्गावरील रस्ते आणि सागरी पुलांची कामे महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असून भविष्यात पर्यटन आणि रोजगार वाढीसाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. मंडणगड व दापोलीच्या पर्यटन विकासासाठी पर्यटनमंत्री असताना अदिती तटकरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

लाडघर व गुहागर समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग नामांकन, तसेच येथील ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न कोकणच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देतील. रायगड किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा, अशी मागणी आपण १७ व्या लोकसभेत संसदेत केली होती, मात्र त्याचे श्रेय कधी घेतले नाही. जनतेची कामे प्रामाणिकपणे, नीतिनियमाने आणि संयमाने करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, संदीप राजपुरे, जि. प. माजी सदस्य प्रकाश शिगवण, भाई पोष्टुरे, नगरसेविका रेश्मा मर्चंडे, प्रियांका लेंढे, भाजपचे अप्पासाहेब मोरे, मुख्याधिकारी महादेव रोडगे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT