आरोपी सरजिल अब्दुलसत्तार पिलपिले pudhari photo
रत्नागिरी

रत्‍नागिरी : रेल्वे पोलिसांना मारहाण करणार्‍यास 3 वर्षे सक्तमजुरी

Assault On Police सहा वर्षांपूर्वीच्या खटल्याचा चिपळूण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडून निकाल

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावरील मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये आरक्षण नसताना आरक्षित डब्यात चढून रेल्वे पोलिसाला हाणामारी केल्याप्रकरणी आणि शासकीय कामात अडथळा केला म्हणून रत्नागिरी येथील आरोपी वर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या गुन्ह्याप्रकरणी आरोपी सरजिल अब्दुलसत्तार पिलपिले (रा. मिरजोळे रत्नागिरी) याला तीन वर्षांची सक्तमजुरीची कैद आणि 12 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. चिपळूण येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी ही शिक्षा बुधवारी सुनावली.

दि. 26 एप्रिल 2018 रोजी ही घटना घडली होती. रत्नागिरीहून मुंबईकडे जाणार्‍या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी सरजिल पिलपिले व त्याचा भाऊ आसिफ पिलपिले हे दोघे मुंबईला चालले होते. मात्र, आरक्षित डब्याचे तिकीट नसताना त्यांनी त्यात प्रवेश केला व तेथील प्रवाशांशी हुज्जत घालू लागले. यावेळी टीटीई त्यांच्या डब्यात दाखल झाल्यावर त्यांनी तपासणी केली असता, त्यांच्याशीही त्यांनी वाद घातला. टीटीईने त्यांना अनारक्षित डब्यात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी तो धुडकावत लावून ए.सी.मधील प्रवाशांसोबत वाद सुरू केला.

या नंतर टीटीईच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी रेल्वे पोलिस दाखल झाले. यामध्ये़ गोरखनाथ शेळके, वसीम खान हे रेल्वे पोलिस डब्यात दाखल झाले व संबंधितांना ताकीद दिली असता सरजिल पिलपिले याने पाण्याची बाटली पोलिसांच्या डोक्यात घातली व त्यांनाच मारहाण केली. चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एम. शेळके यांच्याकडे होता. या प्रकरणी न्यायालयाने आठजणांची साक्ष घेतली. अखेर आज या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी सरजिल पिलपिले याला तीन वर्षे सक्तमजुरी व बारा हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सरजिलचा भाऊ आसिफ हा पसार असून त्याचा शोध लागलेला नाही.

यासाठी येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पीएसआय पंकज खोपडे यांनी सहकार्य केले तर हा खटला सरकारी वकील अ‍ॅड. पुष्कराज शेट्ये यांनी लढविला. त्यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनुपमा ठाकूर यांनी सहाय्य केले. याप्रकरणी चिपळूणे न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावून धडा शिकविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT