गुहागर शहर : तालुक्यातील प्रौढ महिलेवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने या खटल्यामध्ये चिपळूण सत्र न्यायालयाने आरोपी टुनटुनकुमार रामप्रवेश महतो याला जन्मठेप, एक महिना सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावली आहे.
ही घटना सन २०१९ मध्ये घडली होती. गुहागर तालुक्यातील प्रौढ महिला गावाबाहेरील शेतामध्ये काम करीत होती. त्यांच्या गावाबाहेरील शेतात दुपारच्या वेळेत काम करीत असताना आरोपीने आजूबाजूला कोणी नाही, हे पाहून जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रौढ महिला ही पायवाटेने गावाकडे जायला निघाली तेव्हा आरोपीने पाठीमागून धावत येऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तिच्या दोन्ही हाताला दोरी बांधून तिचा गळा कपड्याने बांधून आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडिता निपचित झाल्यावर तिच्यावर जंगली झाडाझुडपांच्या फांद्या टाकून आरोपी निघून गेल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
त्याला पकडून ग्रामस्थांनी पीडितेला दाखविले असता तिने परप्रांतीय आरोपीला ओळखले व त्यानंतर पीडितेने गुहागर पोलिस ठाणे येथे आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तपासिक अधिकारी संदीप पाटील यांनी आरोपीविरुद्ध तपास करून भा.दं.वि.का.क. ३७६, ३०७, ३४१, ३४२ अन्वये दोषारोप दाखल केले होते.
ज्येष्ठ सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी सरकार पक्षातर्फे हा खटला चालवताना नऊ साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद केला. परिणामी चिपळूण सत्र न्यायाधीश म्हालटकर यांनी आरोपीला जन्मठेप व एक हजार रु. दंड, दंड न भरल्यास महिन्याचा सश्रम कारावास, कलम ३०७ अन्वये जन्मठेप व दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास, कलम ३४१ अन्वये एक महिना साधा कारावास, कलम ३४२ अन्वये एक महिना साधा कारावासाची शिक्षा फर्मावली आहे. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले असून त्यांना गुहागर कोर्ट पैरवी ए. एस. शिंदे यांनी सहाय्य केले.