रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी खालावतेय! 
रत्नागिरी

Ratnagiri Water Crisis| रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी खालावतेय!

वाढत्‍या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्यात ८ टक्‍क्‍यांनी घट; यंदा पाणीसाठा ७५ टक्‍क्‍यांवर

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : कोकणातील रत्‍नागिरी जिल्‍ह्यात यंदा पावसाने मोठी निराशा केल्‍यामुळे दुष्काळाची परिस्‍थिती आली आहे. जिल्‍ह्यातील सहा तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुसरीकडे पावसाअभावी, वाढत्‍या तापमानामुळे काजळी, जगबुडी वगळता जिल्‍ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळी घटत चालली असून आतापर्यंत ८ टक्‍क्‍यांनी पपाणी पातळी घटली आहे. गतवर्षी जिल्‍ह्यात ८३ टक्‍के असलेला पाणीसाठा, यंदा ७५ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. अशीच परिस्‍थती असल्‍यास उन्‍हाळ्यात पाण्याची भीषण परिस्‍थिती होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे रत्‍नागिरी शहर, ग्रामीण भागातील नागरिकांनो पाणी जपून वापरणे आवश्‍यक आहे.

रत्‍नागिरी जिल्‍ह्यात दरवर्षी साडेतीन हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडत असतो. मात्र यंदा एल निनोच्‍या प्रभावामुळे पावसाने जिल्‍ह्याकडे पाठच फिरवली. जून, जुलै वगळता ऑगस्‍ट, सप्‍टेंबर महिन्‍यात पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतली. त्‍यामुळे पावसाचा हंगाम कोरडा गेला आहे. यावर्षी २ हजार ४३७ मिमी म्‍हणजेच ७२ टक्‍के इतका पाऊस पडला आहे.गतवर्षी वार्षिक सरासरीच्‍या ९० टक्‍के पाऊस पडला असला तरी मे महिन्‍याच्‍या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जून,जुलै महिन्‍यात पाऊस धो धो बरसला. सप्‍टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये पूरपरिस्‍थिती निर्माण झाली होती. धरणात ही ८३ टक्‍के पाणीसाठा होता. यंदा ९५ टक्‍के पेक्षा जादा पाऊस पडण्याचा अंदाज होता मात्र एन निनोचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला. परतीचा पाऊस ही म्‍हणावा तितका झाला नाही.

ऐन पावसाळ्यात उन्‍हाचा चटका बसत आहे. यंदा जिल्‍ह्याचे तापमान ४० अंशावर गेले होते. वाढत्‍या तापमानालामुळे जिल्‍ह्यातील नद्यांची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होवू लागली आहे. असेच तापमान वाढल्‍यास पाणी पातळी आणखी खाली जाण्याची शक्‍यता आहे. उन्‍हाळ्यात कोकणात भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

तीन नद्यांची पाणी पातळी झाली कमी

जिल्‍ह्यातील आठ प्रमुख नद्या वाहतात. यापैकी सर्वाधिक पाणीपातळी काजळी नदीची त्‍याच्‍यानंतर बावनदीची आहे. यंदा काजळी, जगबुडी, बावनदी, वशिष्ठी, कोदवली या नद्या वगळता शास्‍त्री, सोनवी, मुचकुंदी यातीन प्रमुख नद्यांची पाणीपातळी १ मीटरपेक्षाही खाली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT