रत्नागिरी : विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 1 लाख 67 हजार 825 ग्राहकांकडे 25 कोटी 91 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत 1 हजार 182 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील 708 ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती 1 लाख 46 हजार 277 ग्राहकांकडे 14 कोटी 51 लाख, व्यावसायिक 14 हजार 400 ग्राहकांकडे 5 कोटी 25 लाख, औद्योगिक 1 हजार 639 ग्राहकांकडे 3 कोटी 28 लाख, सार्वजनिक सेवा 5 हजार 150 ग्राहकांकडे 2 कोटी 60 लाख आणि इतर वर्गवारीतील 359 ग्राहकांकडे 27 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात 43 हजार 843 ग्राहकांकडे 05 कोटी 84 लाख, चिपळूण विभागात 24 हजार 648 ग्राहकांकडे 3 कोटी 31 लाख, खेड विभागात 26 हजार 375 ग्राहकांकडे 03 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 708 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात 34 हजार 851 ग्राहकांकडे 6 कोटी 12 लाख, कुडाळ विभागात 38 हजार 108 ग्राहकांकडे 7 कोटी 04 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 474 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे. थकित वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च 2026 अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या थकित बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरण विभागाकडून करण्यात आले आहे.