गुहागर शहर : महावितरणच्या भूमिगत वीज वाहिन्यांबरोबर एअरटेल कंपनीनेही तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी केबल टाकली आहे. हे काम करताना जागा नसेल तर गटार सोडून साईडपट्टीमध्ये महावितरणची केबल टाकण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती. यासाठी महावितरणकडून पाच कोटीचा निधी बांधकाम विभागाकडे जमा करण्याचे ठरले आहे. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम न देताच महावितरणने साईडपट्टी खोदली. मात्र त्याची डागडुजीही केलेली नाही. यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी थकबाकी वसुलीची नोटीस महावितरणला बजावली आहे.
तालुक्यातील समुद्र किनारपट्टीपासून सात किलोमीटर अंतराच्या मार्गावर भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून होत आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या परवानगीमध्ये रस्त्याच्या मध्यरेषेपासून 15 मीटर अंतरावर केबल टाकावी, मात्र जागा नसेल तर गटार सोडून साईडपट्टीमध्ये महावितरणची केबल टाकावी असे बांधकाम विभागाने परवानगी देताना म्हटले होते. यासाठी महावितरणकडून पाच कोटी रुपये बांधकाम विभागाकडे जमा करण्याचेही ठरले.महावितरणने साईडपट्टी सुस्थितीत केली नाही तर या रक्कमेतून सार्वजनिक बांधकाम विभाग याची दुरुस्ती करणार आहे. मात्र महावितरणने कोणताही निधी न भरता रस्त्याची साईटपट्टी खोदत खुलेआम केबल टाकली असल्याने पावसात याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. महावितरण व एअरटेल कंपनीने केलेल्या चुकीच्या साईडपट्टी खोदाईमुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे नुकसान झाले आहे. मोडका आगर ते तवसाळपर्यंतचा रस्ता धोकादायक ठरत आहे.
नरवण येथे पाणी रस्त्यावर येऊन अनेकांच्या घरांमध्ये चिखलयुक्त पाणी शिरत आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचा फटका महावितरण व एअरटेल या दोन्ही कंपन्यानी स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर घरत आहे. दुसरीकडे एअरटेल कंपनीला केबल टाकण्याची परवानगी देतानाही जागा नसेल तरच साईडपट्टीमध्ये केबल टाकण्याची सूचना करण्यात आली होती. एकूण क्षेत्रापैकी 25 टक्के साईडपट्टीमध्ये केबल टाकण्याचे ठरवण्यात आले होते. यासाठी 39 लाखांची रक्कमही करारनाम्यामध्ये ठरली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेमध्ये तब्बल रस्त्याच्या 80 टक्के भागामध्ये एअरटेल कंपनीने साईटपट्टी खुदाई करून आपली केबल टाकल्याचे दिसून येत आहे. यामुळे 39 लाखाची रक्कम सुमारे 80 लाखापर्यंत पोहोचली असून याबाबतची नोटीसही सार्वजनिक बांधकाम विभागाने एअरटेल कंपनीला बजावली आहे. याबाबत महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होऊ शकला नाही.
महावितरण व एअरटेल कंपनीकडून साईटपट्टीत टाकण्यात येणारी केबल ही 1.20 मीटर खोलीवर टाकायची असताना अतिशय कमी खोलीवर टाकत दोन्ही कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ही योजना धोकादायक ठरली आहे. दुसरीकडे साईटपट्टी सोडून अनेक ठिकाणी गटारामधून दोन्हीही लाईन टाकल्या जात आहेत. त्यामुळे या अनागोंदी कारभाराबाबत प्रशासन कारवाई करेल का? नियमानुसार केबल पुन्हा टाकल्या जातील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.