रत्नागिरी : राज्यातील अंगणवाडीचे बांधकाम आधुनिक करण्यासाठी शासनाने अंगणवाडी बांधकामाच्या निधीत घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे आता बिगर आदिवासी भागासाठी १८ लाख ५० हजार, आदिवासी भागासाठी २० लाख ३५ हजार आणि नक्षलग्रस्त भागासाठी २४ लाख पाच हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम आता स्मार्ट होणार आहे.
शासनाने यापूर्वी २०१० मध्ये मंजूर केलेला आराखडा आणि २०२२ मधील बांधकाम दर रद्द करून मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तयार केलेला ६०० चौरस फुट क्षेत्रफळाचा नवीन आराखडा लागू केला आहे. नवीन निर्णयानुसार बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी इमारतीसाठी १८.५० लाख रुपये, आदिवासी व डोंगराळ भागासाठी २०.३५ लाख तर नक्षलग्रस्त भागासाठी २४.०५ लाख रुपये इतका बांधकाम खर्च मंजूर करण्यात आला आहे. हे दर सर्व करासह असून २०२६ ते २७ ते २०२८-२९ या तीन आर्थिक वर्षांसाठी लागू राहणार आहेत. नवीन बांधकाम खर्चामध्ये अंगणवाडी इमारत, शौचालय, दिव्यांगासाठी रॅम्प, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, पाणी साठवण व्यवस्था, रंगरंगोटी सुविधांचा समावेश आहे.