रत्नागिरी ः तालुक्यातील माडबन विजयदुर्ग ते नाटे परिसरात शनिवारी रात्री समुद्रात मोठ्या स्फोटासारखे आलेले आवाज हे खोल समुद्रात जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधून फायर केल्याने आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या आवाजाबाबत आधी मिसाईल फायर केल्याचा गैरसमज प्रत्यक्षदर्शी मच्छीमाऱ्यांचा झाला आणि त्यातून अफवा पसरवण्यात आली.
शनिवारी रात्री 9.30 ते 10 वा. सुमारास माडबन आणि विजयदुर्ग येथील खोल समुद्रात साधारपणे 20 नॉटिकल माईल अंतरावरून काही स्फोटासारखे आवाज नागरिकांना ऐकू आले होते. या आवाजांमुळे तेथील नागरिक भयभित झाले होते. याबाबत पोलिस प्रशासनाला माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी ड्रोन पेट्रोलिंग केली. कोस्टगार्डकडच्या नौकांनीही त्या परिसरात पेट्रोलिंग केले. तसेच मुंबईहून कोस्टगार्डची इंटरसेप्टर नौकाही त्या ठिकाणी वळवण्यात आली होती.
रविवारी सकाळी कोस्टगार्डकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्या समुद्रातून एक टग जात होते. त्या टगने 3 ते 4 वेळा सिग्नल फायर केले होते. परंतु, त्यावेळी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात मोठे आवाज ऐकू आल्याने त्यांचा मिसाईल फायर होत असल्याचा गैरसमज झाला. तो गैरसमज त्यांनी सर्वत्र पसरवला होता. नागरिकांनी अशा कोणत्याही गैरसमजांवर विश्वास न ठेवण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.