देवरुख : रुग्णालयात जमलेले ग्रामस्थ.  
रत्नागिरी

Ratnagiri News : माभळेतील प्रज्वलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; पाच दिवसांत चौकशीचे प्रशासनाचे लेखी आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : संगमेश्वर - माभळे येथे गणेश विसर्जनावेळी सोनवी नदीपात्रातील धोकादायक खड्ड्यात बुडून प्रज्वल पुरुषोत्तम घडशी या तरुणाचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. महामार्ग चौपदरीकरण कामादरम्यान गाळ उपसा व भरावासाठी नदीपात्रात करण्यात आलेल्या खोदकामामुळे हे धोकादायक खड्डे निर्माण झाल्याचा आरोप करत नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रज्वलचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संबंधित ठेकेदारावर केवळ चौकशी न करता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

शनिवारी सायंकाळी गणपती विसर्जनासाठी सोनवी नदीपात्रात उतरलेले पुरुषोत्तम घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल हे दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी पुरुषोत्तम यांना वाचविण्यात यश आले, मात्र प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर नदीपात्रातील धोकादायक खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. प्रज्वलचे आजोबा गुणाजी घडशी यांनी नदीपात्रातील खड्ड्यांबाबत गंभीर आरोप केले. महामार्ग चौपदरीकरण कामाशी संबंधित ठेकेदार कंपनीने गाळ उपशाच्या नावाखाली नदीपात्रात मोठमोठे खड्डे केल्याचा आरोप त्यांनी केला. या खड्ड्यांबाबत संबंधितांना सूचना करूनही ते बुजविण्यात आले नाहीत, असा दावा त्यांनी केला.

गणेश विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदीपात्रात उतरणार, हे माहित असतानाही या धोकादायक खड्ड्यांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. प्रज्वलचा मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्रामस्थ व नातेवाईकांनी प्रशासनासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रज्वलच्या मृत्यूची माहिती मिळताच जि. प. सदस्य संतोष थेराडे यांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक भूमिका घेतली. पोलिस प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रज्वलच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळाला पाहिजे, तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी पं. स. सभापती शर्वरी वेल्ये, सहदेव बेटकर, जि. प. सदस्या माधवी गीते, विशाखा कुवळेकर, दिलीप गीते, बाळकृष्ण काष्ट्ये, दिलीप पेंढारी, विजय कुवळेकर, माभळे सरपंच मनोहर जाधव, उपसरपंच जोशी, प्रदीप घडशी, रमेश घडशी यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते. नदीपात्रातील खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता असतानाही ते का बुजविण्यात आले नाहीत, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी ग्रामस्थ व नातेवाईकांशी चर्चा केली. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची पाच दिवसांत चौकशी करण्यात येईल आणि चौकशीत दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.

लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शविली. अखेर रविवारी सकाळी ६ वाजता प्रज्वलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लेखी आश्वासनामुळे तूर्तास ग्रामस्थांचा आक्रोश शांत झाला असला तरी ५ दिवसांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे माभळे परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT