खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनी विरोधातील आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. परिसरातील 11 ग्रामपंचायतींनी ठराव करून कंपनी बंद करण्याची मागणी मान्य केली असून, यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल व पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.\
लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव कालुस्ते बुद्रूक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी या ग्रामपंचायतींनी मिळून लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती नावाने 45 नागरिकांची समिती गठित केली आहे. या समितीने प्रशासनासमोर स्थानिक नागरिकांच्या भावना मांडल्या आणि कंपनीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. या बैठकीत आंदोलनाचे प्रमुख प्रतिनिधी रवींद्र हरिश्चंद्र गोवळकर, संजय आंब्रे, संजय साळवे, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत-देसाई आदी उपस्थित होते. आंदोलकांनी ठामपणे सांगितले की, कंपनी बंद होईपर्यंत संविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवला जाईल. स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या या विरोधामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, आगामी काळात या आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनाला चालना दिल्याचे मुख्य कारण म्हणजे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी पिफास या घातक रसायनाचे उत्पादन करत असल्याचे आरोप आहेत. यामुळे कोकण नागरी संघर्ष समितीमार्फत कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू आहे आणि अकरा ग्रामपंचायतींच्या या पाठिंब्यामुळे आंदोलन अधिक बळकट झाले आहे.