खेड : तालुक्यातील कोतवली गावाच्या हद्दीतील सोनपात्र नदीत एम.आय.डी.सी. लोटे येथील काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दुषित झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षता महेश तांबे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
ही घटना जून 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले असून, खेड पोलिसांनी गु.र.नं. 333/2025 अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 279, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात फिर्यादी तांबे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लोटे एम.आय.डी.सी. परिसरातील योजना ऑर्गेनिक, पुष्कर केमिकल, श्रेष्टा ऑर्गेनिक तसेच अन्य कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाणी थेट सोनपात्र नदीत सोडले जात आहे. यामुळे गावातील नागरिक, जनावरे, तसेच नदीवर उपजीविका अवलंबून असलेले मच्छीमार आणि शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कारखान्यांमधून सोडल्या जाणार्या सांडपाण्यामुळे नदीचे पाणी पूर्णपणे दुषित झाले असून शेतीची उत्पादकता कमी होणे, जनावरांचे आजार, आणि पिण्याच्या पाण्याचा स्रोत असुरक्षित होणे असे परिणाम दिसून आले आहेत. या घटनेने कोतवली परिसरात संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी औद्योगिक कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तत्काळ नदीतील पाण्याचे नमुने तपासून दोषी कंपन्यांविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खेड पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.