लांजा : रात्रीच्यावेळी घरात टीव्ही पाहत बसलेल्या माणसांवर घरात घुसून बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री ९ वा. बेनी बुद्रूक कुसुमलेवाडी येथे घडली. घाबरलेल्या घरातील माणसांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारील जंगलात पसार झाला आणि पुढील अनर्थ टळला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष गोविंद सुर्वे (५० ) व हर्षद राजेंद्र सुर्वे (१९, दोघेही राहणार बेनी बुद्रूक कुसुमलेवाडी) या दोघांवर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करण्यात आले. मात्र संतोष सुर्वे यांच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेनी बुद्रूक, कुसुमलेवाडी येथे संतोष गोविंद सुर्वे व त्यांची पत्नी बुधवारी रात्री घरात ९.१५ वाजता पत्नी टीव्ही पाहत बसले होते. याचवेळी घराच्या मागील दरवाजाने बिबट्या अचानक घरात शिरला. बिबट्याला पाहताच सुर्वे यांच्या पत्नीने घाबरून जोरजोरात आरडाओरडा केला. मात्र बिबट्याला घराबाहेर पडण्यास दरवाजा मिळत नसल्याने बिथरलेल्या बिबट्याने संतोष सुर्वे यांच्यावर जबर हल्ला केला.
संतोष सुर्वे यांनी बिबट्याशी दोन हात करत स्वतःला बिबट्याच्या तावडीतून वाचवले. मात्र बिबट्या आणि त्यांच्यात झालेल्या झटापटीत ते गंभीर जखमी झाले. सुर्वे यांच्यावर बिबट्याने केलेले हल्ला पाहून सुर्वे यांची पत्नीने जोरजोरात आरडाओरड केल्याने बिबट्या पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पळून जाताना बिबट्याचा हल्ला
दरम्यान, आवाजाच्या दिशेने शेजारील घरातील हर्षद सुर्वे हा सुर्वे यांच्या घराकडे धावून येत असतानाच त्याच क्षणी बिबट्या समोरील दरवाजाने बाहेर पळून जात होता. यावेळी घरात धावून येणाऱ्या हर्षदवरही बिबट्याने हल्ला केला. मात्र तिघांनीही जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने शेजारील जंगलात पलायन केले.
बिबट्याच्या हल्ल्यात संतोष व हर्षद जखमी झाले असून यामध्ये संतोष यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, हातावर बिबट्याची जबर नखे लागून ते गंभीर जखमी झाले आहेत, तर हर्षद याच्या डोक्यावर व हातावर बिबट्याची नखे लागून तो जखमी झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच कुसुमलेवाडीसह गावातील नागरिकांनी जखमी संतोष सुर्वे व हर्षद सुर्वे यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र संतोष सुर्वे यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
भरवस्तीतील घरात शिरून बिबट्याने केलेल्या हल्ल्याने बेनी बुद्रूक गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आहे. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, बेनी बुद्रुक गावचे सरपंच परेश खानविलकर यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेऊन जखमींची चौकशी केली व जखमींवर तत्काळ औषध उपचार करण्याच्या सूचना केल्या. वन विभागाने बेनी बुद्रूक कुसुमलेवाडी येथे जाऊन परिसराची पाहणी केली.