मृत बिबटया pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News : शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकित अडकून जखमी बिबटयाचा मृत्यु

Wildlife crime: फुफुसाला झालेल्या इन्फेक्शनमुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अहवाल

पुढारी वृत्तसेवा

Leopard death in Ratnagiri

राजापूर : तालुक्यातील तेरवण गावातील एका आंबा बागेत वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकित अडकून जखमी झालेल्या बिबटयाला वनविभागाने रेस्क्यु करून काढल्यानंतर उपचार करतानाच त्या बिबटयाचा मृत्यु झाला आहे.

हा बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय सुमारे ४ ते ५ वर्ष असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. वनविभागाच्या वतीने या मृत बिबटयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. शनिवारी ३ मे रोजी हा प्रकार घडला आहे.

फुफुसाला झालेले इन्फेक्शन (संसर्ग) या मुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अहवाल पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी केला आहे.अशा प्रकारे फासकीत अडकून या बिबटयाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने पुन्हा एकदा अशा प्रकारे शेतात व बागांमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावल्या जाणाऱ्या फासक्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशा प्रकारे फासकी लावणाऱ्यांचा वनविभागाने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

03 मे रोजी मौजे तेरवण येथे विजय नारायण सरफरे रा. भू यांच्या मालकीच्या आंबा बागेमध्ये नर जातीचा बिबट्या फासकीमध्ये अडकला असल्याचे आनंद राजाराम पाध्ये यांनी भ्रमणध्वनी वनविभागाला सांगितले. यानंतर वन विभागाची रेसक्यू टीम तातकाळ घटनास्थळी रवाना झाली.

यावेळी घटना स्थळाची पाहणी केली असता, बिबट हा फासकित अडकला असल्याचे दिसून आले. बिबट्या हा त्याच्या हालचाली वरून तसेच फासकी तोडून फासकी लावण्यात आलेल्या आंबा झाडाची फांदी तोडून बागेलगत झुडपामध्ये अडकला असल्याचे दिसून आले. वन विभागाचे अधिकारी व रेसक्यू टिमने या बिबट्यास सुरक्षितरित्या पकडून पिजऱ्यामध्ये बंधिस्त केले. हा बिबटया काही प्रमाणात जखमीही झाला होता.

यावेळी त्याच्यावर राजापूर पशुधन विकास अधिकारी वैभव चापडे, पशुधन पर्यवेक्षक संतोष गोरे व कोल्हापूरातील वनविभागाचे डॉ. वाळवेकर यांनी या जखमी बिबट्यावर उपचार सुरु केले. हा बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय सुमारे ४ ते ५ वर्ष असल्याचे पशुधन विकास अधिकारी यांनी संगितले. दरम्यान या बिबट्यावर उपचार सुरू असतानाच बिबट्या हा मृत झाला.

बिबट्याचे अवयव तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविले

त्यानंतर मृत बिबट्याचे शव शासकीय वाहनात ठेवून रानतळे येथे वन विभागाच्या अखत्यारीत वनरक्षक निवासस्थान आवारामध्ये आणण्यात आले. पशुधन विकास अधिकारी राजापूर यांच्या मार्फत मृत बिबट्या शवाचे शव विच्छेदन करण्यात आले व बिबट्याचे अवयव हे तपासणी करिता प्रयोग शाळेत पाठवण्याकरिता प्लास्टिकच्या बरणीमध्ये घेण्यात आले. हा बिबट्या उष्माघात तसेच फुफुसाला झालेले इन्फेक्शन (संसर्ग) यामुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अहवाल पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी केला आहे.

त्यानंतर त्याच ठिकाणी विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट केले.

या कामगिरीसाठी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, चिपळूण रत्नागिरी , वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार ,वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनपाल लांजा सारीक फकीर, वनपाल पाली , न्हानू गावडे ,वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक कोर्ले श्रावणी पवार , वनरक्षक लांजा नमिता कांबळे, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, पशुधन विकास अधिकारी कोल्हापूर डॉ.वाळवेकर, वनरक्षक कांदळवन किरण पाचारणे, वनरक्षक चिपळूण शिंदे, मेजर व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, संतोष चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे. अशा प्रकारे बिबटयाचा मृत्यु झाल्याने प्राणी प्रेमींकडून हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT