समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणार ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’  
रत्नागिरी

Ratnagiri News : समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणार ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’

येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जयगड पोलिस ठाण्याकडून राबवला जाणार नावीन्यपूर्ण उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

वैभव पवार

गणपतीपुळे : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी आता ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’ची विशेष मदत होणार आहे. जयगड पोलिस ठाण्याकडून हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असून बुधवारी गणपतीपुळे समुद्रात रोबोटीक वॉटर क्राफ्ट मशीनच्या सहाय्याने जयगड पोलिस ठाण्याकडून पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक सराव घेण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जयगड पोलिस ठाण्याला दोन रोबोटीक वॉटर क्राफ्ट प्राप्त झाले आहेत. गणपतीपुळे व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर व आरे वारे या समुद्रकिनाऱ्यावर प्रत्येकी एक, तर गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर दोन रोबोटीक वॉटर क्राफ्ट देण्यात आले आहेत. गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे मोठे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची दररोज मोठी गर्दी असते.

तसेच याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याचे विशेष आकर्षण असल्याने समुद्र स्नानासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते, परंतु खोल समुद्रात जाऊन समुद्र स्नानाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना अनेक वेळा समुद्रात बुडताना बाहेर पडणे कठीण होते. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर असलेले स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक, होमगार्ड व पोलिस आदी यंत्रणा तत्काळ समुद्राकडे धाव घेऊन बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम माणुसकीच्या भावनेतून करतात, परंतु याच अनुषंगाने समुद्रकिनाऱ्यावर एखादी दुर्घटना घडत असल्यास तत्काळ यंत्रणा तत्पर असावी या उद्देशाने रोबोटीक वॉटर क्राफ्ट या मशीनचा वापर आता केला जाणार आहे. यासाठी जयगड पोलिस ठाण्याकडून होमगार्ड व पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना रोबोटीक वॉटर क्राफ्टशी संबंधित यंत्रणेकडून खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हा रोबोटीक वॉटर क्राफ्ट समुद्राच्या २०० मीटर अंतरापर्यंत सहजगत्या जाऊ शकतो. तसेच समुद्राच्या उसळणाऱ्या मोठ्या लाटांचा सामना करून सहजगत्या समुद्राच्या खोल पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर घेऊन येऊ शकतो. पावसाळी हंगामात खवळलेल्या समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन या रोबोटीक वॉटर क्राफ्टची बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी विशेष मदत होणार आहे.

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर काही वर्षात मोठ्याप्रमाणात समुद्रात बुडून मृत्यूच्या दुर्घटना घडल्या आहेत. तसेच अनेक पर्यटकांना समुद्रात बुडताना वाचविण्याचे काम स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक, होमगार्ड व पोलिस यंत्रणेने केले आहे, परंतु आता समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या जोडीला रोबोटीक वॉटर क्राफ्ट दाखल झाल्याने समुद्रकिनाऱच्‍या दुर्घटनांना आळा बसेल असे मत स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटीक वॉटर क्राफ्ट हे आधुनिक मशीन अत्यंत सुरक्षित व महत्त्वपूर्ण आहे. या मशीनमुळे समुद्रात बुडत असलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी व अशा दुर्घटनांना तत्‍काळ आळा बसवण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने एक महत्‍वपूर्ण विशेष पाऊल उचलले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर जयगड पोलिस ठाण्यातर्फे होमगार्ड व पोलिस कर्मचारी रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या मदतीने आपली कामगिरी चोख बजावणार आहेत. यामुळे अनेक पर्यटकांचा जीव वाचणार आहे.
-संजय पाटील, पोलिस निरीक्षक, जयगड पोलिस ठाणेे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT