रत्नागिरी : ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून जिल्ह्यासह राज्यभरात माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाला सुरुवात झाली आहे.
1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये सहभाग घेवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, ग्रामीण रूग्णालय, उपआरोग्य केंद्राना कोट्यवधीचे बक्षीस दिले जाणार आहे. हे अभियान सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी रहावी, यासाठी काम सुरू आहे.
अभियानांतर्गत प्रत्येक गाव आरोग्य संपन्न केले जाणार आहे. तसेच या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक स्वच्छता, शुध्द पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रीत आहे. संसर्गजन्य रोगमध्ये कुष्ठरोग, क्षयरोग, विषमज्वर, गॅस्ट्रो, अतिसार, डेंग्यू, मलेरिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, प्रसूतीपूर्व काळजी, लसीकरण, कुटूंब कल्याण, कुपोषण निर्मूलन, शुद्ध पाणी, प्रदूषण नियंत्रण, जैविक कचऱ्याची विल्हेवाट इत्यादी आरोग्य समस्येवर भर दिला जाणार आहे.
अशी असणार बक्षिसे
राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करीत पहिला क्रमांक मिळणवाऱ्या जिल्हा परिषदेला 5 कोटी रूपये, दुसऱ्या क्रमांकाला 3 कोटी आणि तिसऱ्या क्रमांकाला 2 कोटी रूपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्वोत्तम ठरणाऱ्या ग्रामीण रूग्णालय आणि उपजिल्हा रूग्णालयांना 75 लाख रूपयांचा विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. उपआरोग्य केंद्रांना पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा व राज्यस्तरासाठी 5 लाख आणि 25 लाख रूपये दिले जाणार आहेत. गावांनाही पहिल्या क्रमांकासाठी जिल्हा, विभाग राज्य स्तरासाठी 25 लाख, 1 कोटी आणि 5 कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहे.