रत्नागिरी : रत्नागिरी विभागात नवीन स्मार्ट बसेस आल्या मात्र त्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत आहेत. तर उर्वरित काही बसेस जिल्हांतर्गत बसेस धावतात. मात्र लांजा, राजापूर, चिपळूण, रत्नागिरीसह इतर आगारातील बसेसची दुरवस्था झालेली आहे. खुर्च्या तुटलेल्या, सीट खराब, कुशन निघालेले अशी अवस्था झालेली आहे. लांजा-काजरघाटी मार्गे रत्नागिरी या बसेसची अवस्था तर बिकटच झाली आहे. त्यामुळे प्रवासी वैतागलेले आहेत. त्यांना खुर्च्यावर बसताना अडचण होत असून नाईलाजास्तव उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
रत्नागिरी विभागातील जुन्या, स्क्रॅप झालेल्या तब्बल 145 बसेस भंगारात देण्यात आले. त्या लिलावातून तब्बल साडेतीन कोटींचे उत्पन्न मिळाले. मात्र आणखी कित्येक बसेस खराब झालेल्या असून त्या तशाच रस्त्यावर धावत आहेत. रत्नागिरी, राजापूर, लांजा, गुहागर, चिपळूण, देवरुखसह शहरातील बसेसच्या ही दुरवस्था झालेली आहे. आतील सीट खराब झालेल्या आहेत. बसेसमध्ये अस्वच्छता झालेली आहे. धुळीने गाडी घाण होत आहे.प्लॅस्टीक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या पडलेल्या आहेत. मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रवासी एसटी बसेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही सीट खराब असल्यामुळे उभे राहून प्रवास करावा लागत आहे. खुर्च्या तुटलेल्या, कुशन निघालेले, सीट खाली पडलेले आहे. कित्येक प्रवाशांना किरकोळ इजा झालेली आहे. तसेच अशा सीटवर बसल्यामुळे पाठ दुखण्याचा त्रास वाढला आहे. शहरातील बसेसची अवस्था त्याहून वाईट झालेली आहे. त्यामुळे नव्या बसेसची मागणी प्रवाशांकडून होत आहे. नाहीतर आहे त्या बसेसची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नोकरदार, व्यापारी, सर्वसामान्य, विद्यार्थी प्रवाशांमधून होत आहे.
नव्या बसेस,ई-बसेस येणार कधी?
145 हून अधिक बसेस भंगारात गेल्यामुळे रत्नागिरी विभागात बसेसची संख्या कमी झाली आहे. तसेच अद्याप कित्येक बसेस खराब आहेत. आहे त्याच परिस्थितीत रस्त्यावर धावत आहे.
त्यामुळे नव्या स्मार्ट बसेस, ई-बसेस आल्यास शहराबरोबर ग्रामीण वाहतूक सुरळीत होईल. अद्याप चार्जिंग स्टेशनचे काम अपूर्ण असल्यामुळे खेड, रत्नागिरी, चिपळूणचे काम कासवगतीनेच सुरू आहे.