Cattle Smuggling Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : लांजा-दाभोळे मार्गावर जनावरांची अवैध वाहतूक

दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल; वाहनासह एकूण २.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

लांजा : लांजा-दाभोळे मार्गावर कुरचुंब फाटा येथे नियमांचे उल्लंघन करून जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप वाहनासह एकूण २ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सत्यजित गंगाराम कोलापटे (वय २३, रा. आंबा मानोलीजवळ धनगरवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आणि सुरेश धोंडीबा बरागडे (वय 33, रा. चांदोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

लांजाचे पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे हे पोलिस पथकासह गस्तीवर असताना लांजा-दाभोळे मार्गावरील कुरचुंब फाटा येथे बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच ०९, जीजे २८२५) संशयास्पदरीत्या जात असल्याचे निदर्शनास आल्‍यावर पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनाच्या हौद्यामध्ये दोन बैल अत्यंत दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आले. तसेच वाहनाचा हौदा चारही बाजूंनी ताडपत्रीने बंद करण्यात आला होता. त्यामुळे जनावरांसाठी पुरेशी हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. जनावरांना दुखापत होऊ नये, यासाठी वाहनात आवश्यक पार्टीशन करण्यात आलेले नव्हते. तसेच बैलांसाठी चारा-पाणी आणि प्रथमोपचाराची कोणतीही व्यवस्था नसल्याचे आढळून आले. जनावरांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक प्रमाणपत्र घेण्यात आलेले नव्हते. तसेच वाहनावर गुरे वाहतूक करीत असल्याचा आवश्यक फलकही लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संबंधित वाहतूक नियमबाह्य पद्धतीने केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासणीत स्पष्ट झाले.

या कारवाईत प्रत्येकी १० हजार ५०० रुपये किंमतीचे दोन बैल आणि २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा बोलेरो पिकअप टेम्पो असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कळंत्रे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा, प्राण्यांची वाहतूक नियम, मोटार वाहन कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही संशयितांना नोटीस बजावण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल यू. यू. शेडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT