लांजा : शहर व परिसरात अनधिकृत टपर्या व खोक्याविरोधात न.पं.ने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या उपस्थितीत लांजा-साटवली मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनधिकृत खोके हटविण्यात आले.
लांजा-साटवली मार्गावरील अनधिकृत खोक्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचे तक्रार अर्ज न.पं.ला प्राप्त झाले होते. तसेच याच मार्गावरील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनीही तक्रारी केल्या होत्या. या मार्गावरील रस्त्यालगत हातगाड्यांवर दुपार ते संध्याकाळी मोठी गर्दी होत असे. हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असून वारंवार वाहतुकीला अडथळा होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अखेर नगरपंचायतीकडून खोके हटविण्याची कारवाई करण्यात आली. अतिक्रमणे काढलेल्या रस्त्या लगतच्या जागेत यापूर्वी १३ अनधिकृत खोके होते. त्यापैकी वापरात नसलेले चार खोके महिनाभरापूर्वीच हटविले होते. उर्वरित नऊ खोकेधारकांना नगरपंचायतीकडून जुलै महिन्यात नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतरही खोके कायम असल्याने २५ ऑगस्ट रोजी पुन्हा नोटीसा बजावून ४८ तासांच्या मुदतीत अनधिकृत खोके हटविण्याचे निर्देश दिले होते. अखेर मुदत संपल्याने सोमवारी नगर पंचायत पथकाने कारवाईला सुरुवात केली. कारवाईदरम्यान सहा खोकेधारकांनी स्वतःहून खोके हटविले, तर उर्वरित तीन खोके न.पं. कर्मचाऱ्यांनी हटविले.
या कारवाईत न.पं. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, प्रभारी नगरअभियंता रणवीर कोकरे-देसाई, नगररचना सहायक सुचेत बन्ने, लिपिक संजय गुरव, संतोष आगरे यांच्यासह इतर कर्मचारी सामील झाले होते.