30 जुलै 2014 रोजी आंबेगावजवळील माळीण गावामध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली होती.  pudhari photo
रत्नागिरी

Sahyadri landslides Zone: सह्याद्रीत मानवी अतिक्रमण; भूस्खलनाचा 900 गावांना धोका, भूकंपाने थरथरतेय पर्वतरांग

Sahyadri Mountain Range: मानवी हव्यासाने सह्याद्रीचा होतोय र्‍हास : गेल्या साठ वर्षांत 1 लाख 21 हजार भूकंपांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

Sahyadri Mountain Range Landslide Zone Earthquake Reason

चिपळूण : समीर जाधव

महाराष्ट्रासह सहा राज्यांत विस्तारलेला आणि जैवविविधतेचे आगर असलेला सह्याद्री पर्वत मानवी अतिक्रमणामुळे अक्षरश: ओरबडला जात आहे. जमिनीच्या हव्यासापोटी होणार्‍या वृक्षतोडीमुळे केवळ इथली संपन्न जैवविविधताच धोक्यात आलेली नाही, तर दरड कोसळणे, भूस्सखलन, महापूर आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाणही वाढले आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये गेल्या साठ वर्षांत तब्बल एक लाख 21 हजारहून अधिक भूकंप झाले आहेत. जमिनीची होणारी धूप वाढल्याने 900 हून अधिक गावे भूस्खलनाच्या छायेत आहेत.

पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणार्‍या सह्याद्री पर्वताची निर्मिती सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यांमुळे झाली असावी, असे मानले जाते. सातपुडा पर्वतरांगेपासून सुरू होणारा हा पर्वत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यापर्यंत पसरला आहे. त्याची लांबी 1600 कि.मी. असून महाराष्ट्रात तो 750 कि.मी.वर व्यापला आहे.

भूकंपाने थरथरतोय ‘सह्याद्री’

सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे. भारताचा भूभाग उत्तरेकडे व ईशान्येकडे सरकत आहे. त्यामुळे हिमालयाच्या रांगा या अत्यंत धोक्याचे भूकंपप्रवण क्षेत्र झाल्या आहेत. भूगर्भात चालू असणार्‍या हालचालींमुळे खडकांच्या थरात विषम ताण निर्माण होतो व हा ताण असह्य झाला की, खडकांचे स्तर भंग पावून पुढे-मागे किंवा खाली-वर सरकतात. ही विहंग क्रिया अकस्मात घडून आल्यामुळे धक्का बसून हादरा बसतो आणि भूकंप होतो. अशा प्रस्तर भंगामुळे सह्याद्री पर्वतरांगांची निर्मिती झाली असल्याने सातत्याने भूकंपाचा धक्का सह्याद्री पर्वतरांगेत बसतो. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत.

नऊशेहून अधिक गावांना भूस्खलनाचा धोका

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा बराचसा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. या पर्वतरांगांमधील दर्‍याखोर्‍यांत व डोंगरकड्यालगत असलेली 900 हून अधिक छोटी-मोठी गावे व वाड्या-वस्त्यांना भूस्खलनाचा धोका आहे. 1980 पासून अशा घटनांमध्ये वाढ झाली. अतिवृष्टी, भूकंप, जंगलतोड या कारणांमुळे दरवर्षी असे प्रकार घडत आहेत. येथील डोंगर उताराला किंवा कड्यांना गेलेले तडे रुंदावत चालले आहेत.

जैवविविधता धोक्यात

तब्बल पाच हजार जातींच्या वनस्पती व औषधी वनस्पती, 139 जातींचे पशू, 508 प्रकारचे पक्षी, 179 जलचर या शिवाय ज्ञात-अज्ञात अशी जैवविविधता असलेली सह्याद्रीची पर्वतरांग मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात येत आहे. जगातील दहा हॉटस्पॉटमध्ये सह्याद्री पर्वतरांगांचा समावेश होतो.

...तर निसर्ग रौद्ररूप दाखविणार! - आपण डोंगर पोखरत आहोत, नद्यांचे प्रवाह अडवत आहोत. निसर्गाची हत्या करून जेव्हा आपण प्रगती साधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निसर्ग कधी ना कधी आपले रौद्ररूप दाखवणारच. सह्याद्रीची होणारी धूप थांबवण्यासाठी केवळ नद्यांमधील गाळ काढणे पुरेसे नाही; तर सह्याद्रीचे निसर्ग संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
डॉ. राजेंद्र सिंह, जलतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT