रत्नागिरी : जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात तीन महिन्यांवरील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 10, 11, 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून यासाठी भूमी अभिलेख कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.
पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिनस्थ कार्यालयात माहे ऑक्टोबरअखेरीस 1211 मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी 512 मोजणी प्रकरणे मोजणी पूर्ण होऊन कार्यालयीन कामावर प्रलंबित असून उर्वरित प्रकरणांपैकी 102 मोजणी प्रकरणे वरील नमूद सुट्टीचे दिवशी कार्यालयातील उपलब्ध भूकरमापकांमार्फत निपटारा करण्यात येणार आहे. ज्यासाठी 51 भूकरमापक सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी दिली. या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होणार आहे.
या मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविली जात आहे. यातील 1211 मोजणी प्रकरणे मुदतबाह्य झालेली असून, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रलंबित आहेत. यापैकी 512 प्रकरणांत मोजणी पूर्ण झालेली असून, 604 प्रकरणांच्या मोजणी तारखा जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 95 मुदतबाह्य मोजणी प्रकरणांना अद्याप मोजणी तारीख मिळण्यावर शिल्लक असून, या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी इतर तालुक्यातील 51 सर्वेअर यांना बोलावून मोहीम यशस्वी केली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत 102 मोजणी प्रकरणे 10, 11, 17 व 18 जानेवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशी मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून, संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून अर्जदारांनी उपस्थित राहून आपल्या जमिनींची मोजणी करून विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख इंगळी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.