रत्नागिरी: मागील कित्येक वर्षांपासून धनेश पक्ष्यावर आम्ही संशोधन करीत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त आढळणारा प्राणी हा धनेश महापक्षी आहे. त्याचे जतन, संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र, रत्नागिरीत 99 टक्के जागा ही खासगी आहे तर केवळ 0.8 टक्के जागा ही शासकीय आहे. त्यामुळे वनसंपत्ती वाढवणे गरजेची आहे. जंगलतोड कमी करून मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेची आहे. जी जागा वनक्षेत्र होवू शकते ती जागा शोधून वन विभागास सांगितल्यास वनसंपत्ती वाढेल. जास्तीत जास्त जंगल वाढले, वाचले पाहिजे तर पक्षी वाचेल. धनेश पक्षीचा वापर करून स्थानिक कोकणवासीयांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे यासाठी काम करू, असेही पक्षी मित्र प्रतिक मोरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन वन विभाग व वन विभाग रत्नागिरी यांच्यावतीने रविवारी पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या संमेलनात पक्षी मित्र प्रतिक मोरे यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे धनेश पक्षीची माहिती दिली. शेतकऱ्यांना मदत करणारा, फायदा देणारा असा हा धनेश पक्षी आहे. हा पक्षी पहाटे 4 ते 5 वाजता उठतो. देवराईमध्ये याचा आवाज घुमतो. देशात त्याच्या 9 प्रजाती असून रत्नागिरी जिल्ह्यात 4 प्रजाती धनेश पक्षाची आढळतात. नर आणि मादी अशा दोन प्रजाती आहेत. हा पक्षी 72 टक्के फळे खातो. तसेच सरडे, पाली, उंदीर हे खातो मात्र हा पक्षी खाली येत नाही. झाडावरीलच शिकार करून खातो. 20 ते 25 ग्रॅम विष्ठा करीत असतो. त्याच्या विष्ठेतून बीजनिर्मिती होते आणि अनेक झाडे येतात. त्यामुळे धनेश संवर्धनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात जागा असणे गरजेची आहे. जंगलतोड वाढत असल्यामुळे त्यांना राहायला घरीटी कमी पडत आहेत. लाकडी घरटे करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जुनी झाडे तोडू नयेत जेणेकरून धनेश पक्षाला थांबता येईल, लोकांनी, पक्षी मित्रांनी धनेश संवर्धनासाठी काम करावे, असेही मोरे यांनी सांगितले.
संमेलनात दुसऱ्या चर्चासत्रात पक्षी मित्र विराज आठले यांनी स्थांलतरित पक्षाविषयी माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध वातावरण पक्षांची गर्दी होत असते. बरेच पक्षी निरंतर स्थांलतर करतात. मात्र रत्नगिरी जिल्ह्यात पक्षी सेंटर नाही, केअर सेंटर नसल्यामुळे पक्षाची अवस्था बिकट होते. त्यांचे जतन, संवर्धन करणे गरज आहे. यासाठी जनजागृती करणे गरज असल्याचे सांगण्यात आले. निकीत शिंदे यांनी रत्नागिरीमधील दुर्मीळ पक्षांसह विविध पक्षांची माहिती दिली.
संगीत नाटकाने पक्षी मित्रांची जिंकली मने
या पक्षी मित्र संमेलनात सायंकाळच्या सुमारास मुंबईच्या पक्षीमित्र संघटनेच्या वतीने पक्षांच्या जीवनावर, त्यांच्या सद्यपरिस्थितीवर संगीत नाटक सादरीकरण करण्यात आले. यावेळी एक तास चाललेल्या नाटकाने सर्वच पक्षीमित्रांचे मने जिंकली.