रत्नागिरी : कुवारबाव येथे मंगळवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास तीन डंपरचा विचित्र अपघात झाला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या डंपरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने जोरदार धडक बसली. धडकेनंतर तो डंपर मागे येत असताना पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या डंपरलाही धडकला.
कुवारबाव येथे डंपर (एमएच ०८ डीडी ७७९४) एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबला होता. याचवेळी चालक अमीन रेड्डी यांच्या ताब्यातील डंपर (एमएच ०८ एपी २६३७)चे ब्रेक लागले नाहीत. त्याने पुढील डंपरला धडक दिली. त्यानंतर संबंधित डंपर मागे येत असताना डंपर (एमएच ०८ डब्ल्यू २९००)ला धडक बसली. अपघातात तिन्ही डंपरचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर कुवारबाव परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली.