चिपळूण : गुहागर - विजापूर मार्गावरील कुंभार्ली घाटात कराड हून चिपळूणकडे येणारी स्विफ्ट डिझायर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. त्यामध्ये अकलूज येथील नायब तहसिलदार रविकिरण रामकृष्ण कदम गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने कराड येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुहागर विजापूर मार्ग कुंभार्ली घाट धोकादायक बनत चालला आहे. त्यातच काही दिवसापूर्वी एक भीषण अपघात घाटात झाला होता. त्यामध्ये आई, मुलगा याला प्राण गमवावे लागले होते. त्यातच सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान रविकिरण रामकृष्ण कदम कराडहून चिपळूणकडे नातेवाईक यांच्याकडे स्विप्ट डिझायर गाडी घेऊन येत असताना एका मोठ्या वळणावर त्यांची गाडी दरीत कोसळली. त्यातच त्यांनी गाडीतून उडी मारली म्हणून सुदैवाने वाचले. मात्र ते गंभीररित्या जखमी झाले.
याबाबत माहिती शिरगाव पोलिस यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी कदम यांना अधिक उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले. ही गाडी नेमक्या कोणत्या दरीत कोसळली आहे याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनंत साळवी ग्रामस्थ व पोलिस कर्मचारी दोरखंडच्या साह्याने दरीत उतरून त्यांनी शोध घेतला. काही तासांनी ही गाडी पोलिसांना दिसून आली.
कुंभार्ली घाट दिवसेंदिवस मृत्युचा सापळा बनत चालला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी केली होती. मात्र आता गुहागर विजापूर मार्ग राष्ट्रीय महामार्गकडे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तोपर्यंत तरी घाटातील दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ, वाहन चालक, प्रवासी यांच्याकडून होत आहे.