Konkan Railway 
रत्नागिरी

Konkan Railway : उन्हाळी विशेष गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

कोकण रेल्वेवरील गर्दी वाढली; स्वच्छता सुरक्षेसाठी अतिरिक्त कर्मचारी

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मे महिन्याच्या सुट्ट्या, लग्नसराई आणि पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, उन्हाळी विशेष गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई–मडगाव, सुरत–मंगळुरू आणि अहमदाबाद–मंगळुरू या मार्गांवर विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसह पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी विशेष गाडी जून महिन्यापर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. या गाडीला रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर रोड, कणकवली, कुडाळ आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना थेट गोवा आणि मुंबईसाठी अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकण आणि गोवा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रेल्वेकडे वळले आहेत.

परिणामी अनेक नियमित गाड्यांमध्ये वेटिंग लिस्ट वाढली असून, काही गाड्यांमध्ये आरक्षणासाठी प्रतीक्षा शेकड्यांमध्ये गेली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे.दरम्यान, सुरत–मंगळुरू आणि अहमदाबाद–मंगळुरू विशेष गाड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातून कोकणमार्गे दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने या गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त डबे जोडण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असून, स्थानकांवरही मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, सावर्डे आणि संगमेश्वर रोड स्थानकांवर प्रवाशांची विशेष गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी खासगी वाहनांऐवजी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत असल्याने रेल्वेवरील ताण वाढला आहे.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर स्वच्छता, सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रवाशांनी आरक्षण करूनच प्रवास करावा आणि गर्दीच्या कालावधीत वेळेआधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT