रत्नागिरी ः शहरानजीकच्या खेडशी येथील मोबाईल दुरुस्ती टपरी फोडून मोबाईल व लॅपटॉप असा 34 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. याप्रकरणी दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत गोवा रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुद्देमालासह मडगाव (गोवा) रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले.
शादाब मोहम्मद मुस्तकीन (27, रा. गाजीयाबाद उत्तर प्रदेश) आणि जुबेर लियाकत अली (22, रा. बागपथ, उत्तर प्रदेश) अशी यातील संशयितांची नावे आहेत. चोरीची ही घटना मंगळवार, दि. 14 जानेवारी रोजी रात्री 9.30 ते बुधवार 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. कालावधीत घडली होती. गुरुवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
याबाबत सुदेश तुकाराम गुरव (30, रा. टेंभ्ये ,रत्नागिरी) यांनी बुधवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, गुरव यांची खेडशी गयाळवाडी येथे मोबाईल दुरुस्तीची टपरी आहे. अज्ञातांनी 14 जानेवारी मंगळवारी रात्री 9.30 ते बुधवार 15 जानेवारी सकाळी 9 वा. कालावधीत टपरीच्या मागील बाजूचा पत्रा लोखंडी सळीने उचकटून चार मोबाईल आणि एक लॅपटॉप असा एकूण 34 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मडगाव येथून गोवा रेल्वे पोलिसांच्या मदतीने या दोन्ही संशयितांच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या.
ही कामगिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, सहाय्यक पोलिस फौजदार विनोद भितळे, पोलिस हवालदार विनायक राजवैद्य आणि पोलिस काँस्टेबल राजेंद्र वळवी यांनी केली.