खेड: तालुक्यातील एका प्रसिद्ध उद्योजकाच्या उत्पादन युनिटवर गुरूवारी (दि.११) सकाळी अचानक सरकारी तपास यंत्रणेच्या पथकाने सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत धाड टाकली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
गुरूवारी सकाळी आठ वाजता ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह कारखान्यात दाखल झाले आणि तात्काळ विविध कागदपत्रे, आर्थिक नोंदी व व्यवहारांची तपासणी सुरू केली. अचानक वाढलेल्या हालचालीमुळे संपूर्ण परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धाड टाकण्यात आलेले उद्योजक रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्थापित नाव असून त्यांचा राजकीय परिघातही प्रभाव मानला जातो. त्यामुळे या कारवाईचा राजकीय वर्तुळातही मोठा उलथापालथीचा विषय बनला आहे.
दरम्यान, पोलिसांची गस्त आणि बंदोबस्तामुळे ही धाड खेड तालुक्यात तसेच जिल्ह्यात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. कोणत्या प्रकरणात ही कारवाई झाली, नेमका आर्थिक गैरव्यवहार कोणता, तसेच ईडीची धाड नेमक्या कोणत्या तपासाच्या अनुषंगाने आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या कारवाईनंतर विविध तर्क-वितर्कांना ऊत आला असून अनेक राजकीय समीकरणांवरही चर्चा रंगू लागल्या आहेत.